Join us

'बबन' सिनेमानंतर भाऊराव घेऊन येणार 'हैद्राबाद कस्टडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 1:27 PM

सिनेमाविषयी आणखीन कोणतीच माहिती समोर आली नसली तरी,लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुपरहिट 'बबन' सिनेमानंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचे नाव 'हैद्राबाद कस्टडी' असे असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरद्वारे त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या नावावरून आणि टीझर पोस्टरवरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो. शिवाय,या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर,थर्ड डिगरीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नव्हे तर,'हैद्राबाद कस्टडी' असे या सिनेमाचे नाव असल्या कारणामुळे,हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे? असा प्रश्नदेखील रसिकांना पडत आहे. 

ग्रामीण आणि वास्तविक समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना ओळखले जाते. 'ख्वाडा', आणि 'बबन' हे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असल्यामुळे त्यांचा आगामी 'हैद्राबाद कस्टडी' हा सिनेमा, सिने रसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.या सिनेमाची विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड, भाऊसाहेब शिंदे, रजनीकांत सदाशिव निमसे आणि सुशीला कानडे यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तूर्तास,आता या सिनेमात कोणत्या कालाकारांच्या भूमिका असणार अशी  सिनेमाविषयी आणखीन कोणतीच माहिती समोर आली नसली तरी,लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'ख्वाडा' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याने 'बबन' सिनेमाकडूनही चांगल्याच अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षांवर बबन तितकासा उतरला  नाही.या सिनेमात खुद्द भाऊराव कऱ्हाडे यांनी बबनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तसेच गायत्री या नवोदित अभिनेत्रीला सिनेमात संधी देण्यात आली होती.त्यामुळे आता या नवीन सिनेमातही नवीन कलाकार झळकण्याची शक्यता आहे. या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.