मुंबईत ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरू झाला तसं समीर वानखेडे हे नाव चर्चेत आलं. बॉलिवूडचे काही बडे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आले तसं हे नाव आणखी प्रकाशझोतात आलं. शनिवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान या ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तर समीर वानखेडे (Sameer Wankhede) या नावाची भलतीच चर्चा झाली. समीर वानखेडे हे एनसीबीच्या (NCB) मुंबई कार्यालयात झोनल डायरेक्टर आहेत. शिवाय आपल्या एका आवडत्या मराळमोळ्या अभिनेत्रीचे पतीही आहेत. होय, समीर हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे (Kranti Redkar )पती आहेत. 2017 साली क्रांती व समीर यांचा विवाह झाला. त्यांना जुळी मुलं आहेत.समीर वानखेडे एक धडाकेबाज, प्रामाणिक अधिकारी आहे आणि क्रांतीला आपल्या नव-याचा अभिमान आहे. ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत क्रांती समीर यांच्याबद्दल भरभरून बोलली.
काय म्हणाली क्रांती?समीर हे अतिशय मेहनती आहेत. वेगवेगळी प्रकरणं, त्याअनुषंगानं त्यांची कारवाई सुरूच होती. पण बॉलिवूडशी संबंधित काही ड्रग्ज प्रकरणांमुळे ते चर्चेत आले. ते सतत कामात असतात आणि मी त्यांना त्यांची ‘स्पेस’ देते. काय झालं, कसं झालं, हे मी त्यांना कधीच विचारत नाही. कारण मी त्यांच्या नोकरीचा, त्यातील गोपनियतेचा आदर करते. घराचा सगळा जिम्मा मी सांभाळते, जेणेकरून त्यांना त्यांचं काम करता यावं. कधीकधी ते इतके बिझी असतात, की झोपतही नाहीत. 24/7 ते कामात असतात आणि फक्त 2 तास झोपतात. एखाद्या केसवर ते कोणाशी फोनवर बोलत असतील तर मी त्यांत कधीच ढवळाढवळ करत नाही. ते रोज गुप्त मोहिमांवर, प्रकरणांवर काम करत असतात आणि याबद्दल घरी कोणाशीही काहीही शेअर करत नाही. घरी आल्यावरही ते स्वस्थ बसत नाही. टीमच्या सतत संपर्कात असतात, असं ती म्हणाली.
मुलं वडिलांना मिस करतात, पण...आमची जुळी मुलं आहेत. ते कधीकधी त्यांच्या बाबाला मिस करतात. ते साहजिकही आहे. ती 3 वर्षांची आहेत आणि बाबा त्यांना घरी हवा असतो. पण मी घरात आहे आणि मुलांची काळजी घेतेय, यामुळे समीर निश्चिंत असतात. समीर यांनी त्यांचं खासगी आयुष्य, मुलं, कुटुंब देशासाठी समर्पित केली आहेत आणि बायको म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो, असंही ती म्हणाली.
मी आनंदी आहे...समीर स्वभावाने अतिशय संकोची आहेत, शांत आहेत. ते फार क्वचित हसतात. अलीकडे ते मीडियाला मुलाखती देऊ लागले आहेत, हे पाहून मला आनंद झालाय. मुलाखतीत देताना जरा हसत जा, असं मी गमतीने त्यांना सांगते. पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ते एनसीबी आॅफिसर समीर वानखेडे आहेत आणि ते जसे आहेत तसा मी त्यांचा आदर करते. मला त्यांचा अभिमान वाटतो, असंही क्रांती म्हणाली.
'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात क्रांतीने अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.