अनेक भूमिका गाजवणारे, प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण ( Vijay Chawan) आज आपल्यात नाहीत. मात्र आजही प्रेक्षकांमधील त्यांचे स्थान कायम आहे. त्यांचा अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा वरद चव्हाण (Varad Vijay Chawan) पुढे नेतोय. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वरद अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. दरम्यान नुकतेच विजय चव्हाण यांच्या कुटुंबाने अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या स्मृतीचित्रे या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी विजय चव्हाण यांच्या आठवणीत त्यांची पत्नी विभावरी आणि मुलगा वरद भावुक झाला होता. त्याने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
विजय चव्हाण यांनी २४ ऑगस्ट, २०१८ मध्ये जगाचा निरोप घेतला. दरम्यान वरदने २०१६ सालातील विजय चव्हाण यांचा एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला की, २०१६ साली बाबांची तब्येत खूप खालावली. त्यावेळी रुंजी या मालिकेत काम करत होतो. त्याचे शूट जव्हारला सुरू होते. ते जवळपास ३०-४० दिवस आजारी होते आणि डॉक्टरांनी ते फार आठ दिवस जगतील. मुलाला बोलवून घ्या असे सांगितले होते. त्यावेळी मला केदार सर, भरत सर यांचे सतत फोन येत होते. मालिकेच्या निर्मात्यांनीही मला जा म्हणून सांगितलं. मी माझ्या आत्या, आईला फोन करत होतो तर त्या बाबा ठीक आहेत असं सांगायच्या. त्यावेळी व्हिडीओ कॉल वगैरे अशी सोय नव्हती. त्यामुळे मला दाखवा, तुम्ही खोटं बोलताय असं सांगूही शकत नव्हतो. त्याचवेळी बाबा थोडे शुद्धीवर आले होते आणि ते माझ्याशी फोनवर बोलले की,'शूटिंग संपवून ये.' ते असे म्हणाल्यावर निर्मात्यांना मी जात नाही, असे सांगितले.
जो माणूस ३० दिवस काही प्रतिसाद देत नव्हता तो...
तो पुढे म्हणाला की, मी शूटिंग संपवलं आणि जेव्हा फोर्टीसला पोहोचलो तेव्हा कळले की बाबांची तब्येत इतकी खालावली होती. त्यानंतर एक दिवस अचानक त्यांना शुद्ध आली. तेव्हा ते आईला म्हणाले की,'मला वरदचं लग्न बघायचं आहे.' जो माणूस ३० दिवस काही प्रतिसाद देत नव्हता तो त्या दिवशी बाहेर पडला. तो दिवस होता ८ फेब्रुवारी. त्या दिवशी माझा आणि बाबांचा वाढदिवस असतो. तो आमच्यात योगायोग आहे. मग आम्ही मुलगी बघायला सुरुवात केली.
विजय चव्हाण यांनी प्रज्ञाला मारली सूनबाई अशी हाक
वरदला प्रज्ञाचं स्थळ आलं. त्यांनी तिचा फोटोदेखील पाहिला नव्हता. त्यांनीदेखील वरदला होकार दिला. कारण तिची आई त्याची १०० डेज ही मालिका पाहत होती. जेव्हा त्यांचं त्यांच्या घरी मुलुंडला आले तेव्हा विजय यांनी प्रज्ञाला सूनबाई अशी हाक मारली. त्यांना जेव्हा कारण विचारले तेव्हा ते तू होकार देणार हे माहित आहे असे म्हणाले. पण माझे म्हणणे होते, सासू-सूनचं पण जुळलं पाहिजे, असे वरद आणि विभावरी यांनी सांगितले.
....आणि महिन्याभरात बाबा गेलेएप्रिलमध्ये वरद आणि प्रज्ञाचा साखरपुडा झाला आणि डिसेंबरमध्ये लग्न ठरले. पुढे वरद म्हणाला, या दरम्यान जुलैमध्ये प्रज्ञा भेटायला आली होती आणि तिने बाबांसाठी पोळ्या केल्या. बाबा जेवण जेवले आणि म्हणाले,चला आता मी जायला मोकळा आणि तसेच झाले. महिन्याभरात बाबा गेले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देताना मी खूप रडलो. मात्र ते सगळे पार पडल्यावर तेव्हा खूप मोठे ओझे गेल्यासारखे वाटले कारण त्यांची तब्येत खालवताना मी बघत होतो. आम्हाला ते पाहवत नव्हते. त्यांना यातून सुटू देत असे सतत वाटायचे.