आपल्या उत्तम अभिनयशैलीमुळे रंगभूमी दणाणून सोडणारा अभिनेता म्हणजे प्रशांत दामले (Prashant Damle). आजवर रंगभूमीवर सर्वाधिक प्रयोग करणारा नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नाटक असो, मालिका वा सिनेमा प्रत्येक माध्यमामधून त्यांनी त्यांची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. त्यामुळे आज त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. अलिकडेच त्यांनी 'मित्र म्हणे' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या घराची गोष्ट सांगितली आहे.
साधारणपणे निर्मात्यांमुळे कलाकारांची घरं होतात. परंतु, प्रशांत दामले यांच्या बाबतीत थोडं चित्र वेगळं होतं. त्यांच्यामुळे नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं घर झालं.याविषयी त्यांनी एक किस्सा शेअर केला. पहिले सुधीर भटांमुळे माझं घर झालं त्यानंतर मग मी त्यांना घर घ्यायला मदत केली असं प्रशांत दामले यांनी सांगितलं.
"खरं तर सुधीर भटांमुळे माझं घर झालं. माझी लायकी नसतानाही त्यांनी घे रे घर घे रे असं म्हणत मला मोठं घर घ्यायला लावलं. तुला दोन मुली आहेत अजून किती दिवस 1BHK मध्ये राहणार असं म्हणत त्यांनी मला 2bhk घ्यायला लावलं. ही गोष्ट २००२ सालची आहे. त्यावेळी मी माझं मोठं घर घेतलं", असं प्रशांत दामले म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "१९९८ मध्ये ज्यावेळी सुयोग नाट्य संस्थेचा डोलारा हलायला लागला. त्यावेळी मी त्यांना मदत करायचं ठरवलं. कारण संस्था चालवणं सोपं नाही. मी तर त्या संस्थेमध्ये पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचा पडता काळ आला त्यावेळी मी काही फायनान्स मॅनेज करु का? असं विचारलं. तू एकाच वेळी ५-६ नाटकं करतोस त्या सगळ्यांसाठी मदत करणं मला शक्य नाही. पण, एक नाटक आहे जे सध्या चालतंय ते म्हणजे एका लग्नाची गोष्ट. त्या नाटकातून पैसेही मिळतायेत. त्यामुळे त्या नाटकाचं फायनान्स मी मॅनेज करतो. असं करत मी हळूहळू सूत्र माझ्या हातात घेतली. त्यानंतर त्याचा फायदा होऊ लागला. या फायद्यातून माझ्या निर्मात्याने फ्लॅट, बस, गाडी असं सगळं केलं. त्याचं व्यवस्थित झाल्यानंतर मग मी ती सूत्र पुन्हा त्याच्या हातात दिली."
दरम्यान, सुधीर भट यांच्यामुळे प्रशांत दामले यांचं घरं झालं होतं. त्यामुळे त्यांच्या पडत्या काळात प्रशांत दामलेंनी त्यांना सावरलं. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका लग्नाची गोष्ट या नाटकाविषयीचे अनेक किस्से शेअर केले.