ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमामधून सुरू आहे. दरम्यान, मला सर्वच राजकीय पक्षांमधून ऑफर असल्याचं विधान आज नाना पाटेकर यांनी केलं आहे. मात्र राजकारण हा माझा प्रांत नाही, त्यामुळे कुणाचीही ऑफर स्वीकारून मी निवडणूक लढणार नाही, असे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना नाना पाटेकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले की, निवडणुकीबाबत म्हणाल तर मला ज्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे, त्याचं नाव कळलं तर मी तिथं जाऊन प्रचार करायला सुरुवात करेन. मला निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यांकडून ऑफर आहे. पण समस्या अशी आहे की, मला ते जमणार नाही. राजकारणात गेल्यावर जपून बोलावं लागलं मात्र मला जपून बोलता येणार नाही, असे नानांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सत्तेत गेल्यावर अधिक चांगलं काम करता येईल, असं तुम्हाला वाटतं का. आज सत्तेत आपली सगळीच मंडळी आहे. विरोधी पक्षातही आहेत. सगळ्यांना हात जोडणं हे आपल्याला जमतं. पण जनतेकडे हात जोडून मला मतं द्या, असं मी कधीही म्हणणार नाही. नुसता मी उभा आहे म्हटल्यावर लोकांनी निवडून दिलं पाहिजे, इतकं तुमचं काम चांगलं असलं पाहिजे, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.