सिनेमा, मालिका आणि वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमात सई ताम्हणकर(Saie Tamhankar)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. आता बॅक टू बॅक सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती अलिकडेच द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स या सीरिजमध्ये पाहायला मिळाली. अलिकडेच तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
या मुलाखतीत सई ताम्हणकरला विचारण्यात आले की आपली चूक झाली आहे, हे समजल्यावर कशी वागते. यावर ती म्हणाली की, मला असं वाटतं की मी अशी व्यक्ती आहे जी चार चौघात त्या व्यक्तीची माफी मागायला अजिबात लाजणार नाही किंवा स्वतःची चूक कबूल करायलाही लाजत नाही. त्याच्यामध्ये काहीच कमीपणा नाही आणि मला असं वाटतं की अशा चुका होतातच की आणि व्हाव्यातच म्हणजे एक माणूस म्हणून अशा चुका झाल्याशिवाय सुद्धा तुम्हाला कळत नाही समोरच्याची किंमत. तर मला असं वाटतं ठीक आहे. पण एकच चूक चार वेळा झाली तर तो गाढवपणा असतो पण अशा चुका व्हाव्यात त्याच्यातून शिकायलाच मिळते आणि मला असं वाटतं जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा एकच पर्याय असतो की ते आता सहन करा. फक्त ते अनुभवा आणि पुढे जा. हा एक मंत्र आहे जो मी माझ्या आयुष्यात अवलंबते.
द सीक्रेट ऑफ शिलेदार्सच्या दमदार यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये खास भूमिका साकारणार आहे. तिची बहुचर्चित डब्बा कार्टेल वेबसीरिज या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सईचा बॉलिवूड प्रवास इथेच न थांबता येणाऱ्या काही दिवसात सई क्राइम बीट, ग्राउंड झीरो, मटका किंग अश्या अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समधून हिंदी आणि मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.