भूषण प्रधान (Bhushan Pradhan) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. भूषणने ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतही काम केले होते. त्याने या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत या भूमिकेच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
अभिनेता भूषण प्रधानने नुकतेच मिर्ची मराठी या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्याने ऐतिहासिक भूमिकांबद्दल बोलताना त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल सांगितले. यावेळी त्याला सध्याच्या घडीला ऐतिहासिक भूमिका करताना भीती वाटते का, असे विचारण्यात आले. त्यावर भूषण प्रधान म्हणाला हो. अभिनेता म्हणून ऐतिहासिक भूमिका करताना मनावर दडपण येते. कारण आपण मनापासून काम करू आणि खूप अभ्यास करू. पण निगेटिव्हिटी इतकी वाढली आहे की कोण त्यावरुन काय इश्शू करेल, उगाच काय गोष्टी घडतील हे सांगता येत नाही. त्यामुळे भीती वाटायला लागली आहे. अशा भूमिका करताना लोकांची प्रतिक्रिया काय येईल हे सांगता येत नाही. तुम्ही त्या भूमिकेसाठी खूप मेहनत घ्याल पण नंतर त्यावर निगेटिव्ह काही घडलं तर लोकांपर्यंत काम पोहचणार नाही. तर त्याचा त्रास नक्कीच होतं.
मालिका संपून ४ वर्ष झाली असतील पण...
तो पुढे म्हणाला की, एका वेळेला मनात विचार आला होता की, लोकांना आवडेल की नाही. महाराज म्हणून लोक मला स्वीकारतील का. पण एका वेळेनंतर विचार केला की करा नका करु. कदाचित यानंतर मला यापुढे पुन्हा महाराजांची भूमिका आयुष्यात करायला मिळणार नाही. आज मिळालंय. मला महाराजांचं आयुष्य जगायला मिळतंय. तर मला ते जगायचंय. तुम्हाला आवडतंय की नाही हे नंतर आलं. मला ती भूमिका जगून त्या भूमिकेला न्याय द्यायचा आहे. ती भूमिका मी जगलो. ती भूमिका करताना स्वतःच्या खूप चांगल्या गोष्टी शिकलो आहे. मालिका संपून ४ वर्ष झाली असतील. पण महाराजांची भूमिका केल्यामुळे जे धडे मी शिकलोय. जसे स्ट्रॅटेजी प्लानिंग काय असेल, कोण आपलंय, कोण आपलं नाही, काय चालू असेल हे सगळं आत प्लानिंग चालू असतं. हे या भूमिकेतून शिकलो.