Join us

भूमिका निवडीबद्दल मी चोखंदळ- सुरभी हांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 1:13 PM

अबोली कुलकर्णीगोड चेहरा आणि बोलकं व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री सुरभी हांडे कलर्स मराठीवर अलीकडेच सुरू झालेल्या ‘लक्ष्मी-सदैव मंगलम्-गोष्ट नि:स्वार्थ ...

अबोली कुलकर्णीगोड चेहरा आणि बोलकं व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री सुरभी हांडे कलर्स मराठीवर अलीकडेच सुरू झालेल्या ‘लक्ष्मी-सदैव मंगलम्-गोष्ट नि:स्वार्थ नात्याची’ या मालिकेत आर्वीची भूमिका साकारताना दिसत आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळया प्रकारांत लीलया अभिनय साकारणाऱ्या सुरभीने आता नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. या तिच्या नव्या प्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा...* लक्ष्मी-सदैव मंगलम्​या मालिकेत तू आर्वी (डॉक्टर)ची भूमिका साकारत आहेस. काय सांगशील आर्वीबद्दल?- आर्वी ही खूपच मॉडर्न विचारांची आहे. सगळयांशी ती खूप फ्रेंडली राहते. ती एक वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेणारी युवती आहे. तिच्या घरातील कौटुंबिक वातावरण हे काहीसे बिझनेस ओरिएंटेड असते. तिची आई एक बिझनेसवुमन असते. मात्र, तरीही आर्वीला दुसऱ्यांसाठी वेळ काढायला आणि इतरांवर प्रेम करायला प्रचंड आवडतं. * आर्वी खूपच मॉडर्न विचारांची असून वेस्टर्न स्टाईल कॅरी करते. भूमिकेसाठी कोणती तयारी करावी लागली?- तयारी फार काही करावी लागली नाही. कारण आर्वी आणि सुरभी यांच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे आर्वी ही भूमिका साकारताना मला काही कठीण झालं नाही. उलट मजा आली. कारण मी जशी आहे तशीच प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार आहे. * आर्वीची भूमिका तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होती?- खूप जास्त आव्हानात्मक होती. कारण जशी म्हाळसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचली तशीच आर्वी देखील पोहोचावी असे मला वाटते. प्रेक्षकांनी म्हाळसाला जसं भरभरून प्रेम केलं तसंच त्यांनी आर्वीवरही करावं. म्हाळसा आणि आर्वी या भूमिकांचे दोन पैलू म्हणजे सुरभी. *  ओमप्रकाशसोबतची तुझी सेटवरची ट्यूनिंग कशी आहे? -  खूपच छान. कारण आम्ही या मालिकेत काम करण्याअगोदरही आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण, आम्हाला या मालिकेच्या निमित्ताने एकत्र काम करता आलं, ही एक जमेची बाजू आहे. सेटवर आम्ही खूप धम्माल करतो. मालिकेची संपूर्ण टीमच खूप एन्जॉय करत शूटिंग करत असते.* मालिकेची निवड करताना कोणता विचार केला होता?- संपूर्ण टीम एवढी गुणी आणि अनुभवी असल्याने मालिका निवडताना मी फार विचार केला नाही. ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान होतं, जे मी अत्यंत प्रामाणिकपणे पेललं आहे. * तू भूमिका निवडीबद्दल खूप चोखंदळ आहेस, असं कळलंय. खरंय का ते?- होय, मी भूमिका निवडीबद्दल खूप चोखंदळ आहे. जोपर्यंत मला एखादी भूमिका मनापासून आवडत नाही, तोपर्यंत मी त्या भूमिकेची निवड करत नाही. एकच भूमिका पण तीही कायम लक्षात राहण्याजोगी असावी, त्यासाठी हवी ती मेहनत मी घ्यायला कायम तयार असते. * तू ‘स्टँडबाय’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहेस. ‘स्वामी’ या नाटकातही संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग केले आहेस. शिवाय विविध मालिकांमध्येही काम केलं आहेस. कोणत्या प्रकारात तुला काम करायला जास्त आवडतं?- तसं काही नाही. अगदी कोणत्याही प्रकारांत मला काम करायला आवडतं. भूमिका कोणती आणि माझा त्यात किती सहभाग आहे? हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी भूमिकांबद्दल जास्त चोखंदळ आहे. * वडील संजय हांडे, संगीत दिग्दर्शक आणि आई संगीत विभागाची प्रमुख यामुळे तुझ्यावर संगीताचा किती प्रभाव पडला?-  होय, माझ्यावर संगीताचा खूप प्रभाव पडला. आकाशवाणीवरही माझे बरेच सांगितीक कार्यक्रम झाले आहेत. मी आकाशवाणी ‘ए’ग्रेड आर्टिस्ट आहे. माझ्यासाठी आकाशवाणी म्हणजे घरोबा असल्यासारखाच आहे. मी अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी माझ्या आईचे स्वप्न होते की, मी तंबोरा घेऊन शास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवाव्यात. मात्र, तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण, आता मला वाटतेय की, त्या रियाझाकडे वळायला आता हरकत नाही.* अभिनय तुझ्यासाठी काय आहे?- अभिनय माझ्यासाठी गाणं असू शकतं. कारण, कोणत्याही एका कलेतून आपण व्यक्त होत असतो. मला वाटतं की, अभिनय माझ्यासाठी ती प्रत्येक कला असू शकते ज्यातून मला व्यक्त होता येतं.* मराठी इंडस्ट्रीतील कुणाला तू प्रेरणास्थानी मानतेस?- कामाच्या बाबतीत म्हटलं तर मला प्रियांका चोप्रा आवडते आणि मी करिना कपूरचीही खूप मोठी फॅन आहे. * हिंदी चित्रपटसृष्टीत जर पुन्हा एकदा संधी मिळालीच तर कुणासोबत काम करायला आवडेल?- आमिर खान. त्यांचे चित्रपट मला प्रचंड आवडतात. मला त्यांचे कामाच्याप्रति असलेले त्याग, समर्पण आवडते. त्यांच्यासोबत काम करायला मला नक्की आवडेल.