'बाईपण भारी देवा' चित्रपटाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवले. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिले. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्याबरोबरच 'बाईपण भारी देवा'ने बॉक्स ऑफिस गाजवलं. आता या चित्रपटाला रिलीज होऊन १ वर्ष झाले आहे. त्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदेंनी बाईपण भारी देवाचं पोस्टर शेअर करत लिहिले की, याच दिवशी.. मागच्या वर्षी.. एक आयुष्यात घटना घडली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माझ्या पाठीशी ६ दणदणीत ब्लॉकबस्टर बायका होत्या. “बाईपण भारी देवा” या सिनेमाने मला खुप काही दिलं. द्रव्य रूपात नाही. पण महाराष्ट्रातील तमाम स्त्रीयांच्या मनात एक महत्त्वाची जागा नक्कीच मिळाली.
ते पुढे म्हणाले की, आज वर्ष झालं तरी कौतुकाचा वर्षाव कमी झाला नाही. सैराटनंतरचा गल्ला या सिनेमाने कमावला. मी नेहमीच म्हणतो, एक बाई जर घर चालवते, तर ती नक्कीच सिनेमा चालवू शकते. जबाबदारीची जाणीव आहे. यानंतर जे जे करेन ते ते या सिनेमाच्या तुलनेत प्रेक्षक पहाणार. धुंदीत राहून काम करणार नाही. पुन्हा शुन्यापासून सुरूवात केली आहे. मला खात्री आहे मायबाप प्रेक्षक पुन्हा पाठीशी उभे रहातील. स्वामींसारखेच!!!
'बाईपण भारी देवा'बद्दल...केदार शिंदें यांचं दिग्दर्शन असलेल्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखविण्यात आली होती. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं या सिनेमातून दाखविण्यात आलं होतं.