२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वास सगळ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरते. या चित्रपटात आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी साकारली होती तर नातवाची भूमिका अश्विन चितळे(Ashwin Chitale)ने. श्वास चित्रपटानंतर अश्विन देवराई, शाळा, आशाऍं, टॅक्सी नं नौ दो ग्याराह अशा १६ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अश्विनने चित्रपटात काम करण्यासोबतच आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिले. इंडोलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर अश्विनने फारसी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले. सध्या तो सुफी कवी रुमी यांच्या गझलांचे कार्यक्रम सादर करतो. नुकत्याच एका मुलाखतीत अश्विनने रोमँटिक चित्रपटात काम न करण्यामागचे कारण सांगितले.
अश्विन चितळेने या मुलाखतीत सांगितले की, श्वास चित्रपटानंतर मी जवळपास १६ चित्रपटात काम केले. १२ वी नंतर मला जसे चित्रपट अपेक्षित होते तसे मिळाले नाहीत. टिपिकल रोमँटिक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. एकदा एका मोठ्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून फोन आला. मी त्यांचे नाव सांगणार नाही. ते म्हणाले की एक रोमँटिक चित्रपट करायचाय. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की अहो, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते. त्यांना वाटले की मी पुणेरी माजात बोलतो आहे. म्हणजे तसं नाही म्हणत आहे मी, तुम्ही मला कधी पाहिलंय का? नाच गाण्यासाठी हिरो हिरॉईनसाठी जी पर्सनॅलिटी हवी ती माझ्यात नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला जे रोमँटिक पद्धतीचे चित्रपट ऑफर करताय तर तुम्हाला माहीतीये का मी कसा दिसतोय ते? असा माझा प्रश्न होता.
या कारणामुळे रोमँटिक चित्रपटाला अश्विनने दिला नकार
एकतर मला असे वाटते की श्वासमध्ये मी जे काही काम केले ते माझ्याकडून करुन घेतले होते. त्याचे १०० टक्के क्रेडिट हे संदीप सावंत जे दिग्दर्शक आहेत त्यांनाच जाते. मला तसे चित्रपट करायचे नव्हते म्हणून मी यातून बाहेर पडलो, असे म्हणत अश्विनने रोमँटिक चित्रपटाला नकार दिला होता.