'नांदा सौख्यभरे' या मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) घराघरांत पोहचली. मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून अभिनेत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच अभिनेत्री नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव सोंग्या असून यात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत ऋतुजा बागवे हिने तिला सिनेइंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
ऋतुजा बागवे मुलाखतीत म्हणाली की, माझ्याच नाटकाचा चित्रपट होत असताना मला मी सुंदर दिसत नाही म्हणून मला नाकारले गेले. या सगळ्या गोष्टी माझ्या वाट्याला खूप आल्या आहेत. मालिकेत नायिका मी खूप वर्षांनी झाले. नांदा सौख्यभरे मालिकेत मला मुख्य भूमिका मिळाली. त्या आधी मला नाकारण्यात आले होते. कारण मी हिरोईन मटेरियल नाही.
ती पुढे म्हणाली की, तेव्हापासून मला असा प्रश्न पडायचा की, हिरोईनने सुंदर दिसणे का गरजेचे आहे. ते पात्र दिसणे गरजेचे आहे, मला असे वाटते. काही पात्र असतील त्याला माझे दिसणे योग्य असेल. एक वेळ आली तेव्हा डस्की स्कीन आणि साधारण दिसणाऱ्या मुली प्रेक्षकांना आवडू लागल्या. त्यामुळे मला नायिकेची भूमिका मिळाली. मग काम सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा अनन्यातून सिद्ध केले. पुन्हा चित्रपट बनताना मी सुंदर दिसत नाही म्हणून मला नाकारले.
'सोंग्या' चित्रपटाबद्दल...महाराष्ट्रात आजही अनेक कुप्रथा आहेत, ज्या स्त्रियांवर अन्याय करतात. ज्यात अनेकांच्या आयुष्याची, स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी होते. या सगळ्याविरुद्ध आवाज उठवणारा मराठी चित्रपट 'सोंग्या' येत्या १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समाजातील अन्यायविरुद्ध ठामपणे उभ्या राहणाऱ्या एका जिद्दी तरुणीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने साकारली आहे. ऋतुजा बागवेशिवाय या चित्रपटात अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत.