स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारा 'फिरकी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 4:32 AM
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर परिस्थितीशी झगडण्यासाठी तुमच्याकडे काय शस्त्र आहेत, त्यापेक्षा तुम्ही कठीण परिस्थितीशी कशा पद्धतीने लढता ते ...
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर परिस्थितीशी झगडण्यासाठी तुमच्याकडे काय शस्त्र आहेत, त्यापेक्षा तुम्ही कठीण परिस्थितीशी कशा पद्धतीने लढता ते महत्त्वाचं असतं... या सूत्रावर आधारित नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या 'फिरकी' सिनेमाचा विषय पतंगावर आधारित असून १२ वर्षांच्या मुलाच्या संवेदनशीलतेवर सिनेमा बेतलेला आहे. त्या मुलाचं आयुष्य सुरळीत चाललेलं असतांना त्याच्या जीवनात कशा अडचणी येतात, तो त्यामध्ये कसा अडकत जातो याचे चित्रण यात आहे. त्याची संकटांवर मात करण्यासाठीची धडपड चालू असताना त्याला त्याच्या वडीलांकडून एक साधी गोष्ट, एक सरळ मार्ग कळतो ज्याच्या माध्यमातून तो जिंकतो. असा पतंगाचे रूपक वापरून साकारलेला 'फिरकी' हा चित्रपट.......चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने लोकमतला दिलेल्या भेटीत लेखक व दिग्दर्शक सुनिकेत गांधी म्हणाले, "पतंगबाजीच्या प्रेमात असलेल्या छोट्याशा मुलांची कथा फिरकी सिनेमाद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रत्येकामध्ये एक काहीतरी वेगळी गोष्ट आहे ती सर्वांना ओळखता आली पाहिजे. हा संदेश या चित्रपचातून देण्याचा प्रयत्न केला आहे. फिरकी सिनेमातून आपल्या बालपणीच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल."बालकलाकार पार्थ भालेराव म्हणाला, "मी 'गोविंदा' ही भूमिका साकारली आहे. गोविंदा हा एका खेडेगावात राहणारा मुलगा आहे. त्याची छोटी-छोटी स्वप्ने आहेत. त्याला पतंग उडवायला फार आवडते. त्याची स्वप्ने तो स्वत:च्या हिमतीवर कशी पूर्ण करतो. कुठलाही भक्कम आधार नसताना आलेल्या संकटांना तो हिमतीने कसा तोंड देतो. त्याचे मित्र टिचक्या व बंड्या त्याला संकटातून पुढे जायला कशी मदत करतात हे यातून दाखविले आहे." अथर्व उपासनी सांगतो, माझी टिचक्या नावाची भूमिका आहे. प्रत्येकवेळी पैशाची बाजू सांभाळणाऱ्या मित्राची भूमिका टिचक्या या पात्राद्वारे साकारण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुष्कर लोणारकर हा बंड्या नावाच्या पात्राची भूमिका करतो आहे. या पात्राविषयी सांगायचे झाल्यास टिचक्या जसा सरळ मार्गाने पैसे मिळवतो तसा हा वाकड्या-तिकड्या मार्गाने पैशांचा जुगाड करत असतो. आजवर बऱ्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या निर्माता मौलिक देसाई यांच्या 'फिरकी' चित्रपटात पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर,अभिषेक भाराटे,अथर्व पासनी,अथर्व शाळीग्राम हे बालकलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. याशिवाय हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, किशोर चौघुले हे मराठीतील कलाकारही आहेत. पटकथा व संवाद सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे यांनी लिहिले आहेत. छायांकन धवल गनबोटे तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. अंबरीश देशपांडे, मैउद्दीन जमादार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वेगवेगळ्या जॉनरच्या तीन गीतांना भूषण चिटणीस, श्रीरंग धवले, सुनीत जाधव यांनी संगीत दिले आहे.