Join us

Interview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:55 AM

-रवींद्र मोरे अलिकडेच अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपट ‘लूज कंट्रोल’ रिलीज झाला. यात आपल्या सगळ्यांचे लाडके भालचंद्र (भाऊ) कदम यांनी रास्कर ...

-रवींद्र मोरे अलिकडेच अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपट ‘लूज कंट्रोल’ रिलीज झाला. यात आपल्या सगळ्यांचे लाडके भालचंद्र (भाऊ) कदम यांनी रास्कर या हवालदाराची भूमिका साकारुन आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. भाऊंच्या या चित्रपटातील भूमिकेविषयी तसेच त्यांच्या अभिनय प्रवासाबाबत सीएनएक्सने त्यांच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...* 'लूज कंट्रोल' या चित्रपटाचे कथानक आणि तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?- या चित्रपटात माझे कॅरेक्टर हवालदार रास्कर म्हणून मी साकारली आहे. एक वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळाली म्हणून मी ती केली. अजय सिंग यांनी उत्तम डायरेक्शन केल्यामुळे भूमिकेला न्याय देता आला.  * शूटिंगदरम्यान झालेल्या गमतीजमती आणि सहकलाकारांसोबतची तुमची गट्टी याविषयी काय सांगाल?- शूटिंग दरम्यान एवढ्या गमती-जमती नाही झाल्या, कारण मी शूटिंगला कमी तारखा दिल्या होत्या. त्यात कामे खूप होती. तरीसुद्धा शशांक शेंडेबरोबर काम करताना खूप मजा आली आणि सीन्सवर देखील चांगले काम झाले. हवालदाराचा ड्रेस असल्यामुळे आणि त्यात पुण्यात शूटिंग असल्याने फॅन क्लब खूप होता. शूटिंग चालू असताना खरे पोलीस आल्यावर त्यांना वाटायचे की, आपला स्टाफ काय करतोय इथे, मग जवळ आल्यावर ते आश्चर्यचकित होऊन माझ्याबरोबर सेल्फी काढायचे.  * १९९१ पासून तुम्ही तुमच्या करिअरला सुरूवात केली. आत्तापर्यंत अगणित नाटके, चित्रपट, टीव्ही शोजमध्ये तुम्ही काम केलंय. कसं वाटतं मागे वळून पाहताना?- खूप स्ट्रगल केल्यानंतर आणि जमेल तेवढे शिकत गेल्यानंतर या तिन्ही माध्यमातून शिकायला मिळाले. पण मागे वळून पाहताना वाटते की, हे दिवस विसरू नये आणि पहिल्यासारखा अभिनय, निष्ठा व प्रयत्न करत राहावा. आज खूप आनंद वा मानसिक समाधान मिळते.  * विनोदी भूमिका म्हटल्यावर भाऊचं नाव हे अग्रक्र मानं येतंच. त्यामुळे काय वाटतं किती अवघड असतं लोकांना हसवणं? - जो पर्यंत तुम्ही लोकांच्या मनात घर करत नाही तो पर्यंत खूप कठीण असतं. एकदा का तुम्ही लोकांना आवडायला लागतात की तुमची जबाबदारी वाढते. खूप विचार करुन तुम्हाला काम करावे लागतं. * एक प्रेक्षक म्हणून क्वचितच गंभीर भूमिका करणारा भाऊ आम्हाला फारसा कधी रूचला नाही. आम्हाला तो हसवणाराच कायम आवडतो. मग असं असताना प्रेक्षकांच्या अशा अपेक्षांचं ओझं वाटलं का? - कलाकार असल्यामुळे सगळ्याच भूमिका आपल्याला करायच्या असतात. तशा मी गंभीर आणि विनोदी भूमिका केल्या आहेत. जर कॅरेक्टर छान आणि चित्रपटाचा विषय जर उत्तम असेल शिवाय डायरेक्शनही उत्तम असेल तर लोकांना कुठलीही आपण केलेली भूमिका आवडते. माझ्या सुदैवाने माझ्या फॅन्सना माझ्या दोन्ही भूमिका आवडतात.  * एवढ्या बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ कसा काढता?- माझी फॅमिली माझ्या शेड्यूलप्रमाणे सांभाळून घेते. वेळ असेल तेव्हा मी त्यांच्यासोबत वेळ घालवितो आणि परत मी त्यांच्याकडून एनर्जी घेऊन पुढच्या कामाला निघतो.