Ekda Kay Zala Marathi Movie : ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटानंतर डॉ. सलील कुलकर्णी पुन्हा एकदा एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. होय, सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला, त्यांनीच लिहिलेला आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेला ‘एकदा काय झालं’ हा सिनेमा आज शुक्रवारी 5 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची खास बात म्हणजे, अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) हा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. सोबत मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे (Urmilla Kothare), पुष्कर श्रोत्री, अर्जुन पुर्णपात्रे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटला मिळणारा मिळणारा प्रतिसाद, प्रतिक्रिया पाहून चित्रपटाची टीम भारावली आहे.
काल सिनेमाचा प्रीमिअर पार पडला. या सोहळ्याला मराठीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, त्याची पत्नी शिबानी दांडेकर, बॉलिवूडचे दिग्गज लेखक व गीतकार जावेद अख्तर हेही हजर होते. त्यांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं.प्रीमिअरनंतर ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या खास मुलाखतीत सुमीत राघवन, पुष्कर श्रोत्री, उर्मिला कोठोरे भारावलेले दिसले.‘कोणीही आपल्या जागेवरून उठले नाहीत. चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे, याची पावती आम्हाला मिळाली,’ अशी प्रतिक्रिया सुमीत राघवनने दिली.
पुष्कर श्रोत्री यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. ‘ हा चित्रपट करण्यामागचा सलील आणि आमचा जो उद्देश होता, तो आज सफल झाल्याचं वाटतंय. लोकांनी भेटून चित्रपटाचं मनापासून कौतुक केलं. ही आमच्यासाठी मोठी पावती होती,’ असं तो म्हणाला. उर्मिला कोठारेने यावेळी काहीशी भावुक झालेली दिसली. ‘खूप मस्त वाटतंय. प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे बघून खरंच त्यांना चित्रपट आवडला आहे याची खात्री वाटली. प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत जाऊन हा चित्रपट बघावा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवावी,’ असं ती म्हणाली.