Join us

अशी असणार नागराज मंजुळेच्या सैराट 2 ची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 2:55 PM

सैराट 2 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआर्ची आणि परशाचा मुलगा मोठा झाला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आर्ची आणि परशा हैद्राबादला पळून आल्यानंतर सुमन अक्काने त्यांच्या पाठिशी उभे राहात त्यांना हरपरीने मदत केली होती. हीच अक्का म्हणजेच छाया कदम त्यांच्या मुलाचे संगोपन करणार आहे. त्यानंतर त्याचा ताबा अक्का त्याच्या मावशीकडे देणार आहे. या सिनेमात या मावशीची भूमिका मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली दिल चाहाता है फेम सोनाली कुलकर्णी साकारणार असल्याची चर्चा आहे.

सैराट हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील या चित्रपटाची चर्चा झाली होती. या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच सैराट 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण देखील पुण्यात सुरू झाले असल्याची बातमी एबीपी माझा या वाहिनीने दिली आहे.

एबीपी माझा या वाहिनीने सैराट 2 या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत देखील वृत्त दिले आहे. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, आर्ची आणि परशाचा मुलगा मोठा झाला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आर्ची आणि परशा हैद्राबादला पळून आल्यानंतर सुमन अक्काने त्यांच्या पाठिशी उभे राहात त्यांना हरपरीने मदत केली होती. हीच अक्का म्हणजेच छाया कदम त्यांच्या मुलाचे संगोपन करणार आहे. पण त्यानंतर त्याचा ताबा अक्का त्याच्या मावशीकडे देणार आहे. या सिनेमात या मावशीची भूमिका मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली दिल चाहाता है फेम सोनाली कुलकर्णी साकारणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या कथेत आपल्या आई वडिलांचा खून केलेल्या प्रिन्स मामाचा त्यांचा मुलगा बदला घेणार की चित्रपटाद्वारे एक वेगळा संदेश दिला जाणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सैराट 2 या नावाची नोंदणी झाल्याचे वृत्त देखील त्यांनी दिले आहे. 

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.