Join us

अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार 'आर यु ब्लाइंड?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 8:36 PM

'आर यु ब्लाइंड?' असा सवाल करत एक नवं कोर नाटक मराठी रसिकांच्या भेटीला येत आहे.

मराठी रंगभूमीला आशयघन नाटकांची थोर परंपरा लाभली आहे. मनोरंजनासोबतच डोळ्यांत अंजन घालणारी नाटकंही मराठी नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतली आहेत.  नाटक हे अभिव्यतीच उत्तम माध्यम म्हणून अनेक नाटककार नाटकाकडे पाहत असतात. अनेक नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडत असतात. समाजात वैचारिक क्रांती घडवणाऱ्या या नाटकांच्या यादीत आता आणखी एका नाटकाची भर पडणार आहे. 'आर यु ब्लाइंड?' असा सवाल करत एक नवं कोर नाटक मराठी रसिकांच्या भेटीला येत आहे.

चार्ली स्टुडिओ निर्मित आणि मिलाप प्रस्तुत 'आर यु ब्लाइंड?' हे नाटक ११ सप्टेंबर रोजी प्रायोगिक स्वरूपात पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल होत आहे. पुणे येथील भरत नाट्य मंदिरात संध्याकाळी ५ वाजता या नाटकाचा  शुभारंभ होत आहे. विशाल कदम यांच्या लेखणीतून अवतरलेलं 'आर यु ब्लाइंड?' हे नाटक समाज कसा विघातक होत चाललाय, दिशाहीन बनत चालला आहे, आपण या देशाचे उत्तम नागरिक होण्यापेक्षा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होऊन आपलच कस नुकसान करत आहोत, सगळ्याच धर्मांचा धार्मिक उन्माद, विचारवंतांच्या हत्या हे सगळे आपल्याला कुठे घेऊन निघालेय, यावर हे नाटक सडेतोड भाष्य करते. या नाटकाचं दिग्दर्शन  विक्रम-प्रणव या जोडगोळीने केलं आहे. 

डॉ. रमेश खाडे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. विक्रम पाटील, प्रणव जोशी आणि सागर पवार हे कलाकार नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नेपथ्य देवाशीष भरवडे यांनी केलं असून, संगीत संकेत पाटील यांनी दिलं आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना केली आहे आणि नाटकाचे पोस्टर कनक चव्हाण यांनी केले आहेत. पुण्यातल्या प्रयोगानंतर मुंबई, कोल्हापूर, सातारा येथेही 'आर यु ब्लाइंड?'चे प्रयोग होणार आहेत.