बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतो आहे. २०२३ साली प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका बजावणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे यांना अक्षय कुमार यांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले असता म्हणाले की, गेली चौदा-पंधरा वर्षे मी अभिनय क्षेत्रात काम करतो आहे. बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला केवळ भूमिका महत्वाची असू शकते.
ते पुढे म्हणाले की, काहीजण त्याकडे ड्रीम रोल म्हणून बघू शकतात. माझ्यासाठी शारीरिक, मानसिक तयारी करून त्या भूमिकेला सामोरे जाणे गरजेच असते. त्यामध्ये नैतिक जबाबदारी आहे, हे मी स्वत: समजतो. इतर कोणी काय करावे, हे मोठ्या अभिनेत्याला सांगू शकत नाही.अभिनेता अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती दिली होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीरेखेतील फोटो अक्षय कुमारने शेअर केला होता. हा फोटो लाखो लोकांनी पाहिला होता. पण, काहींनाना अक्षय कुमारची व्यक्तीरेखा आवडली नाही. त्यावरून अक्षय कुमारला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.