अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कामकाज सांभाळत होत्या. मात्र इथे काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यांनी रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भरभरून बोलले आहेत. सोबतच कलाकारांची बाजू मांडताना त्या भावुक देखील झाल्या. प्रिया बेर्डे यांच्या कुटुंबातील सदस्य गेल्या तीन पिढ्यापासुन कलासृष्टीशी निगडित आहेत. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीशी जोडले गेले होते. वडील अरुण कर्नाटकी यांनी इंडस्ट्रीत बॅक आर्टिस्टसाठी काम केलेले आहे. गरजू लोकांना त्यांनी स्वतःच्या पगारातून मदत केलेली आहे. त्यामुळे कलाकारांच्या अडचणी मी खूप लहानपणापासूनच जाणून आहे असे त्या म्हणतात.
राष्ट्रवादी पक्षात मी काम करत होते तेव्हा मंत्र्यांच्या केबिनबाहेर कित्येक तास मला बसून राहावे लागत होते. मात्र या पक्षात आल्यानंतर मला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे असे प्रिया बेर्डे म्हणाल्या. कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी दुसरे कुठलेही माध्यम किंवा संस्था नाहीत. त्यामुळे मी या पक्षाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. मी वयाच्या ८ व्या वर्षांपासूनच नाटकातून काम केलं, वयाच्या १२ व्या वर्षी मला चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली होती. या इंडस्ट्रीत बॅक आर्टिस्टना दुय्यम वागणूक दिली जाते यावर कित्येकदा मी आवाज उठवला आहे.