मराठी सिनेसृष्टीवर दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. आज या अभिनेत्याची २० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांची लेक स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने सोशल मीडियावर अभिनेत्याचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
स्वानंदी बेर्डे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या २०व्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिने अभिनेत्याचा फोटोदेखील शेअर केला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, २० वर्षे उलटून गेली, पण बाबा, तुमच्या आठवणी अजूनही ज्वलंत वाटतात. तुमचा दयाळूपणा, विनोद आणि अतूट प्रेमामुळे आज मी जे काही आहे त्यामुळेच. इतक्या वर्षांनंतरही, तुमचे प्रशंसक, शुभचिंतक तुमच्या कामाची, करिष्माची आणि विनोदाची प्रशंसा करत आहेत. तुम्ही सर्वांवर जबरदस्त छाप सोडली आहे. आपण मागे सोडलेल्या अविश्वसनीय वारशाचा हा एक पुरावा आहे.
तिने पुढे म्हटले की, मी दररोज तुमच्यावर अधिक प्रेम करते आणि मला तुमची खूप आठवण येते. तुमची अनुपस्थिती ही आम्ही गमावलेल्या मौल्यवान वेळेची सतत आठवण करून देते. पण तुमचा आत्मा जगतो, मला जीवनातील आव्हानांमध्ये मार्गदर्शन करतो. पुन्हा भेटेपर्यंत आबा.
अभिनेत्याने या दिवशी जगाचा घेतला निरोप मराठी सिनेइंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप उमटविली होती. १९८९ साली सलमान खानबरोबर मैने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डेंनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट हिट ठरले. सर्वांना खळखळून हसविणार्या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील योगदानामुळे आजही ते रसिकांच्या स्मरणात कायम आहेत.