बेनझीर जमादारस्त्री-पुरूष असा कोणताही भेद नसावा. समाजात महिलांना दुय्यम वागणूक मिळू नये. पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपले स्थान मिळावे यासाठी देशभरातून विविध योजना आखण्यात येतात. त्याचबरोबर मोठया प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येते. आता, समाजात स्त्रियांना त्यांचे स्थान मिळवून देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघानेदेखील घेतली आहे. नुकतीच भारत-न्यूझीलंड क्रिकेट संघाची मालिका झाली. या मालिकेमधील शेवटच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने आपल्या आईचे नाव असलेली जर्सी घातली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे, यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा हा त्यामागचा हेतू होता. नई सोच या अभियानाअंतर्गत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील स्टार क्रिकेटपटूंनी प्रचारासाठी आपल्या जर्सीवर स्वत:च्या किंवा वडिलांच्या नावाऐवजी आईच्या नावाचा वापर केला. त्याचवेळी चंदेरी दुनियेत असेही कलाकार आहेत की, जे नेहमीच आपल्या नावासोबत आईचे नाव लावतात. अशाच काही कलाकारांचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला हा आढावा.
संजय लीला भन्साळी- बॉलिवूडमधील तगडे दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांची ओळख आहे. त्यांनी बॉलिवूडला हम दिले दे चुके सनम, गोलिंयो की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. लाल इश्क या चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर त्यांना बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. अशा या तगडया दिग्दर्शकाच्या नावासोबत नेहमी आईचे नाव असते. लीला हे त्यांच्या आईचे नाव आहे. मध्यंतरी संजयच्या या नावाबाबतच्या विषयावरदेखील बरीच चर्चा रंगली होती. आईचे नाव लावणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची असल्याचे ते सांगतात. संजयचे हे विचार खरंच समाजात आदर्श घालू पाहणारे आहेत.
२. भूषण प्रधान- सतरंगी रे, कॉफी अॅन्ड बरंच काही, मिस मॅच, टाइमपास अशा अनेक चित्रपटातून भूषणने आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. त्याने पिंजरा, ओळख, कुंकू यासारख्या मालिकादेखील केल्या आहेत. प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेतादेखील भूषण सीमा प्रधान असे नाव लावतो. त्याने सोशल मीडियावर आपल्या नावाचे अकाऊंट अशा पध्दतीने उघडले आहे. कोणत्या ना माध्यमातून कलाकारदेखील आपल्या नावासह आईचे नाव लावून जगजागृतीचा प्रयत्न करत आहेत.
३. सिध्दार्थ चांदेकर: प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिध्दार्थ चांदेकर देखील आपले नाव आईच्या नावासह लिहितो. सोशल मीडियावर त्याचे नाव सिध्दार्थ सीमा चांदेकर असे पाहायला मिळते. याविषयी सिध्दार्थ सांगतो, आई-वडिलांचे नाव लावावे हा नियम नसावा, तर चॉइस असावी. आजच्या शतकात हे असे विचार होतात या गोष्टीचा आनंद वाटतो. मी देखील आईचे नाव लावतो या गोष्टीचा मला स्वत:लादेखील खूप अभिमान वाटतो.