100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष पदी डॉ. जब्बार पटेल यांची नियुक्त करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली आहे. आज झालेल्या नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत डॉ. जब्बार पटेल ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी ही दोन नावं स्पर्धेत होती. त्यात जब्बार पटेल यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली आहे. मात्र या बैठकीत 100वं नाट्य संमेलन नक्की कुठे होणार याबाबत निर्णय झालेला नाही. 99 वे संमेलन नागपूरला पार पडले होते. मात्र 100वं नाट्य संमेलन कुठे रंगणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
डॉ. जब्बार पटेल हे मराठी-हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक म्हणून मोठं नाव आहे. जब्बार पटेल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना नाटकात काम करण्याची आणि नाटकाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. सामना हा जब्बार पटेल यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. तुझे आहे तुजपाशी, माणूस नावाचे बेट, वेड्याचे घर उन्हात या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. सामना, उंबरठा, जैत रे जैत, मुसाफिर,सिंहासन यांसारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तसेच डॉ. जब्बार पटेल यांनी काही लघुपटांचे पण दिग्दर्शन केले. उदा. इंडियन थिएटर, कुसुमाग्रज, मी. एस. एम., लक्ष्मणराव जोशी, कुमार गंधर्व.