सध्या सर्वत्र 'झिम्मा २' या मराठी सिनेमाचीच हवा असल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर सात बायकांच्या ट्रीपची गोष्ट सांगणाऱ्या 'झिम्मा' या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू होती. अखेर दोन वर्षांनी 'झिम्मा २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहेत. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'झिम्मा २' पाहण्यासाठी खासकरुन महिला वर्ग थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
'झिम्मा २'मधील गाणी आणि त्यातील काही सीनही व्हायरल झाले आहेत. यातीलच एक म्हणजे निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर यांचा गाडी चालवतानाचा सीन. ट्रेलरमध्येही या सीनची झलक पाहायला मिळाली होती. या सीनमध्ये चित्रपटात निर्मला ही भूमिका साकारणाऱ्या निर्मिती सावंत लंडनच्या रस्त्यावर गाडी चालवताना दिसत आहेत. गाडी ठोकल्याचंही या सीनमध्ये दिसत आहे. पण, लंडनच्या रस्त्यावर जोशात गाडी चालवणाऱ्या निर्मिती सावंत यांना खऱ्या आयुष्यात मात्र गाडी चालवता येत नाही. 'झिम्मा २'च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत हेमंत ढोमेने याचा खुलासा करत या सीनचा किस्सा सांगितला.
'झिम्मा २' निमित्ताने हेमंत ढोमेने लोकसत्ताला मुलाखत दिली. यामध्ये तो म्हणाला, "निर्मिती मावशीला गाडी चालवता येत नाही. त्यात तिला परदेशात गाडी चालवायची होती. जेव्हा तिने स्क्रिप्ट ऐकली तेव्हा ती खूप हसली. आणि मग नंतर तिने रात्री मला गुपचूप फोन केला. मला तर गाडी चालवता येतच नाही. मग, तू हे शूट कसं करणार? असं ती मला म्हणाली. त्यावर मी तिला माझ्याकडे त्याच्यामागचं माध्यम आहे, असं म्हणालो. लो लोडर नावाची एक गाडी असते. ज्याच्यावर आपण गाड्या लोड करून सीन शूट करू शकतो. पण, गाडी चालवताच येत नसल्यामुळे आणि त्याचं ज्ञान नसल्यामुळे निर्मिती मावशीने त्या सीनमध्ये जे केलंय त्यामुळे आणखी मजा येते."
दरम्यान, 'झिम्मा २' हा सिनेमा २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसांत 'झिम्मा २' ने बॉक्स ऑफिसवर ४.७७ कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमात निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, रिंकू राजगुरू, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.