सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा हेमंत ढोमेचा 'झिम्मा' सिनेमा २०२१मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर २०२३मध्ये या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'झिम्मा' प्रमाणेच 'झिम्मा २' सिनेमालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पण, थिएटर गाजवलेला हा सिनेमा ना ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि नाही टीव्हीवर दाखविण्यात आला. पण, आता प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. कारण, 'झिम्मा २' आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे.
हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला 'झिम्मा २' २४ नोव्हेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता तब्बल दीड वर्षांनी हा सिनेमा टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 'झिम्मा २'चं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. येत्या १८ मे रोजी 'झिम्मा २' स्टार प्रवाहवर संध्याकाळी ७ वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करत चाहते 'झिम्मा २'च्या ओटीटी रिलीजसाठी विचारणा करत आहेत. पण, अद्याप सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल काहीच अपडेट मिळालेली नाही.
इंदू आजीच्या वाढदिवसानिमित्त झिम्मा गर्ल्सचं पुन्हा रियुनियन होतं आणि ते पुन्हा एकदा फिरायला जातात, अशी सिनेमाची कथा आहे. 'झिम्मा २'मध्ये निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सुहास जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.