मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता जितेंद्र जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जितेंद्र जोशीची नुकतीच कार्टेल ही हिंदी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात त्याने मधुकर म्हात्रे उर्फ मधुभाईची भूमिका साकारली आहे.
कार्टेल वेबसीरिजबद्दल जितेंद्र जोशीने सांगितले की, यात मुंबईतील वेगवेगळ्या प्रकारचे गॅंग्स दाखवले आहेत, त्यातील एक गँग आहे आंग्रे गॅंग. आँग्रे गँगमध्ये राणी माई आहे आणि तिला अभय नामक एक मुलगा आहे. तसेच तिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिची दोन मुले मेजर आणि मधूकरचा सांभाळदेखील या राणी माईने केला आहे. ती काळा बाजार सांभाळते. या तीन भावंडांपैकी मधूकर हा अस्सल मराठमोळा. स्वतःच्या कामाला प्राधान्य देणारा आहे. एकीकडे तो अतिशय आक्राळ विक्राळ रुप धारण करणारा आहे तर दुसरीकडे माई आणि बायकोपुढे मवाळ आहे. हे निराळेच कॅरेक्टर आहे.
वेबसीरिज आणि वेबफिल्ममधील बोल्ड सीनबद्दलचे मत व्यक्त करताना जितेंद्र जोशी म्हणाला की, कलाकार म्हणून सांगायचे झाले तर कलाकार म्हणून एखादा सीन देताना हा सीन का आहे, असे विचारू शकतो. मला आवडलेले नाही. मी करणार नाही, असे सांगण्याची मुभादेखील कलाकारांना असते. जे कलाकार बोल्ड सीन करतात ते स्वच्छेने करतात. बोल्ड सीन करण्यासाठी जबरदस्ती कोण करत नाही. मला जर कुणी जबरदस्ती केली तर मी ते करत नाही. मी सांगतो मला हे आवडले नाही किंवा आवडले.
तो पुढे म्हणाला की, मला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी आली होती. मात्र मला भूमिका न आवडल्यामुळे चित्रपट नाकारले आहेत. या वेबसीरिजमध्ये माझे बोल्ड सीन आहेत. पण मला ते कुठल्या मर्यादेपर्यंत करायचे तो माझा सर्वस्वी निर्णय आहे. करारात लिहिलेले असते की मी या मर्यादेपर्यंत बोल्ड सीन करेन. या पलिकडे मी करणार नाही. कुणावर काम करण्याची आणि कुणावर पाहण्याची सक्ती केलेली नाही.