Join us

या व्यक्तिला भेटल्यानंतर जितेंद्र जोशी झाला निशब्द, सोशल मीडियाद्वारे केला आनंद व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 4:27 PM

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटल्यानंतर काय बोलायचे हेच जितेंद्रला सुचत नव्हते. जितेंद्रनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देजितेंद्र जोशीने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत दीप्ती नवल आणि नंदिता दास यांना पाहायला मिळत आहे.

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळाली तर त्याला भेटल्यावर काय करायचे, त्याच्याशी काय बोलायचे हेच आपल्याला सूचत नाही. ही गोष्ट केवळ आपल्यासोबतच घडते असे नाही तर सेलिब्रेटीदेखील आपल्या आवडत्या कलाकाराला भेटल्यावर आपले स्टारडम विसरून एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे वागतात. असेच काहीसे नुकतेच जितेंद्र जोशीसोबत घडले. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटल्यानंतर काय बोलायचे हेच जितेंद्रला सुचत नव्हते. जितेंद्रनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

जितेंद्र जोशीने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्यासोबत दीप्ती नवल आणि नंदिता दास यांना पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत जितेंद्रने लिहिले आहे की, इतना कुछ कहना है मुझे के चुप ही हूं मैं.. (मला एवढे काही बोलायचे आहे... पण तरीही गप्पच आहे मी...) मी माझ्या आयुष्यात या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता. मी कोणत्या शब्दांत माझ्या भावना व्यक्त करू हेच मला कळत नाहीये. दीप्ती नवल यांचा मी खूप मोठा चाहता आहे. हा फोटो विक्रमादित्य मोटवानी सरांनी काढला आहे. दीप्ती नवल आणि जितेंद्र यांची भेट मामी फेस्टिव्हलच्या निमित्ताने झाली. 

विक्रमादित्य मोटवानी यांच्या सेक्रेट गेम्समध्ये जितेंद्र जोशीने काटेकरची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र जोशीने या वेबसिरिजमधील त्याच्या निवडीचा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले होते की, मी माझ्या मंदार गोसावी या मित्रासोबत गप्पा मारत रस्त्यावर उभा होतो. आम्ही खूप वेळ तिथेच गप्पा मारत असल्याने अखेरीस आम्ही त्याच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही मस्त जेवलो. गप्पा मारल्या. या गप्पा मारत असतानाच मंदारने सांगितले की तो नेटफ्लिक्सवरील एका वेबसिरिजसाठी कास्टिंग करतोय. 

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यावेळी हे नेटफ्लिक्स म्हणजे काय हेच मला माहीत नव्हतं. त्यावर त्याने मला सांगितले की, ‘सेक्रेड गेम्स’या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने हे एका वेबसिरिजची निर्मिती करत आहेत. त्या दोघांची नावे ऐकताच मी ऑडिशनला जायचा विचार केला. पण त्याआधी रोलबद्दल त्याला विचारले तर त्याने मला सांगितले की, एका हवालदाराच्या भूमिकेसाठी सध्या ऑडिशन सुरू आहे. तू ते ऑडिशन दे... त्यावर मी लगेचच म्हटलं की, नको रे. कारण मराठी कलाकारांना नेहमीच अशाच दुय्यम प्रकारच्या भूमिका दिल्या जातात. मराठीतली काही मोजकी नावे सोडली तर कोणालाच हिंदीत चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. 

माझे हे बोलणे ऐकल्यावर मंदारने मला समजावले की, ही भूमिका खूपच चांगल्या आहे आणि त्याचमुळे मी ऑडिशन देण्यासाठी तयार झालो. मी त्यानंतर काहीच दिवसांत काटेकर या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि त्यात माझी निवड देखील झाली. पण चित्रीकरणासाठी मला सलग तीन महिने द्यावे लागणार होते आणि मी त्यावेळी मी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मी निखिल महाजनचा चित्रपट करत होतो. त्यामुळे मी त्याला याची कल्पना दिली तर त्याने माझ्यासाठी त्या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आणि एवढेच नव्हे तर त्याने मला नेटफ्लिक्सविषयी सांगितले आणि नेटफ्लिक्सला माझे अकाऊंट देखील ओपन करून दिले होते. 

टॅग्स :जितेंद्र जोशी