जॉन अब्राहमच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता. त्याच्या ट्रेलर, प्रोमो व गाण्यांच्या माध्यमातून या सिनेमाची चांगलीच प्रसिद्धी करण्यात आली होती. युटय़ूब तसेच फेसबुक यांसारख्या सोशल साइट्सवरही या सिनेमाला अनेकांनी पसंती दिली होती. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर अभिनेता जॉन अब्राहम व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कौटुंबिक पार्श्वभूमीचा पण रहस्य, नाटय आणि थरार यांनी भरलेला हा चित्रपट अक्षरश: खिळवून ठेवत असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त होतायेत. उत्कृष्ट दिग्दर्शन, छायांकन आणि कलाकारांचा दमदार अभिनय ह्या सिनेमाच्या जमेच्या बाजू! तसेच प्रभावी पार्श्वसंगीत हि सुद्धा एक जमेची बाजू! या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट एक चांगला अनुभव देणारा झाला असल्याच्या प्रतिक्रियाही प्रेक्षक देतायेत.
‘सविता दामोदर पराजंपे’ 'ची कथा शरद आणि कुसुम या दांपत्यांभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्काचरिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्यामुळे त्याच्या जीवनाला वेगळे वळण मिळत यामागील गूढ आणखी वाढत जाते. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
या सिनेमाची बरीच वैशिष्ट्ये आहेत. १९८५ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर हा सिनेमा बेतला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हिंदीतील आघाडीचा अभिनेता जॉन अब्राहमची पावलं मराठीकडे वळली आहेत. जॉनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचा वारसा लाभलेली त्यांची मुलगी तृप्ती हिने या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. रंगभूमीवर गाजलेली कलाकृती सिनेमाच्या रूपाने परत अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्येही या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
सशक्त कथानकाला सुमधूर संगीताची सुरेल किनार जोडण्याचं काम संगीतकार अमितराज आणि निलेश मोहरीर यांनी केलं आहे. मंदार चोळकर आणि वैभव जोशी यांनी या सिनेमासाठी गीतलेखन केलं आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू-अरोरा आणि निशा उपाध्याय-कापडीया या गायकांच्या समुधूर आवाजातील ‘जादुगरी’, ‘स्वामी समर्थ’, ‘किती सावरावा’, ‘वेल्हाळा’ ही वेगवेगळ्या मूडमधील गीतं सिनेमाच्या कथेशी एकरूप होणारी आहेत.