Join us

के. के. मेननची मराठीत एंट्री; तर लोकेश गुप्ते दिग्दर्शकाच्या खुर्चीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 3:37 PM

‘सैराट’, ‘नटरंग’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनी ज्या पद्धतीने बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला, त्यावरून अनेक ...

‘सैराट’, ‘नटरंग’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनी ज्या पद्धतीने बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला, त्यावरून अनेक बॉलिवूड कलाकारांनाही मराठी चित्रपटसृष्टीचे आकर्षण वाटू लागले आहे. सद्य:स्थितीचा विचार केल्यास हिंदीतील अनेक मातब्बर कलाकार सध्या मराठी चित्रपटांमध्ये नशीब अजमावताना दिसत आहेत. आता यामध्ये आणखी एका बॉलिवूड कलाकाराची भर पडली आहे. होय, अभिनेता के. के. मेनन लवकरच एका मराठी चित्रपटात नशीब अजमावताना दिसणार आहे. देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘एक सांगायचंय...UNSAID HARMONY’ या चित्रपटातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून अभिनेता लोकेश गुप्ते हादेखील आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करणार असून, तो दिग्दर्शकाची भूमिका समर्थपणे पार पाडताना दिसणार आहे.  नुकतेच या चित्रपटाचे टायटल लाँच करण्यात आले. अभिनेता लोकेश विजय गुप्तेने मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून स्वत:चा ठसा उमटवला. या सर्व माध्यमांतून बरीच वर्षे काम केल्यानंतर आता लोकेश चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. पहिल्या चित्रपटासाठी त्याने संवेदनशील विषयाची निवड केली असून, या चित्रपटासाठी त्याने के. के. मेननसारख्या मातब्बर अभिनेत्याची निवड केली आहे. चित्रपटाची निर्मितीपूर्व प्रक्रि या पूर्ण झाली असून, दि.९ मार्चला या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरु वात होणार आहे. आपल्या या नव्या इनिंगबद्दल बोलताना के. के. मेनन याने सांगितले की, ‘मराठी चित्रपट मी पाहतो. मराठी चित्रपटाच्या कथा माझ्या मनाला भिडतात. चित्रपटाची कथा मला लोकेशने ऐकवली तेव्हा माझ्या मनाला भिडली. मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच होकार दिला. महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते सुद्धा. या चित्रपटासाठी मी मराठीचे धडे गिरवणार आहे, असे त्याने सांगितले.’ तर लोकेश गुप्तेने सांगितले की, हा चित्रपट पालक आणि मुले यांच्यामधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल आहे. बदलेली जीवनशैली, पालकांचे व्यस्त वेळापत्रक, मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारे जग, जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुले या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम या चित्रपटाद्वारे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी एक उत्तम संवेदनशील नट, उत्तम व्यक्तिमत्व आणि विषय समजून तो तितक्याच ताकदीने मांडणारा कलाकार मला हवा होता. तो अभिनेता मला के. के. मेननच्या रूपाने मिळाला. माझ्यातल्या दिग्दर्शकालाच नव्हे, तर माझ्यातल्या लेखकालाही पटला. त्याला भेटल्यावर माझा निर्णय योग्य असल्याची खात्री झाली आणि मी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असेही लोकेशने सांगितले.  ‘एक सांगायचंय...UNSAID HARMONY’  हा चित्रपट दसºयाच्या मुहूर्तावर म्हणजेच १८ आॅक्टोबरला  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संजय मेमाणे, पुष्पांक गावडे यांची सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कलादिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांची वेशभूषा या चित्रपटाला लाभणार आहे.