Join us

कल्पिता राणे-सावंतचे अभिनयात कमबॅक, 'दि लास्ट डिनर' नाटकातून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 7:31 PM

नृत्यांगणा कल्पिता राणे अभिनयात पुनरागमन करत असून तिचे 'दि लास्ट डिनर' हे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे.

नृत्यांगणा कल्पिता राणे अभिनयात पुनरागमन करत असून तिचे 'दि लास्ट डिनर' हे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकाचा शुभारंभ १८ डिसेंबरला बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये होणार आहे. या नाटकाची निर्मिती कल्पिता राणेची संस्था कल्पांगण सांस्कृतिक केंद्राद्वारे करण्यात आली आहे. या नाटकात कल्पितासोबत अभिनेता स्वप्निल खोत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'दि लास्ट डिनर' या नाटकाची कथा एका तरूण जोडप्याभोवती फिरते. या जोडप्यांच्या सहजीवनाला त्यांच्याच गर्वाचे आणि प्रौढीचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे आज ग्लोबलायझेशन, कार्पोरेटायझेशन व स्पर्धेमध्ये गुरफटले आहेत. या जोडप्यांवर हे नाटक रेखाटण्यात आले आहे. हे दोन अंकी प्रायोगिक नाटक प्रथमेश मिराशीच्या लेखणीतून साकार झाले आहे. तर संकेत मोरेने दिग्दर्शन केले आहे.

या नाटकाबाबत कल्पिता राणे-सावंत खूप उत्साही असून ती म्हणाली की, 'माझी संस्था कल्पांगण सांस्कृतिक केंद्र पहिल्यांदाच नाटकाची निर्मिती करते आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. यात मी मुख्य भूमिका साकारते आहे. दोन पात्रांवर आधारीत हे नाटक आहे. आठ वर्षांपूर्वी आम्ही 'दि लास्ट डिनर' नामक एकांकिका केली होती. तेव्हा आम्ही महाविद्यालयात होतो आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आम्ही ही एकांकिका सादर केली होती. कलाकार, दिग्दर्शक व लेखक ही टीम आताही तिच आहे. ही टीम घेऊन आम्ही फुल लेन्थ नाटक करतो आहे. दोन अंकी नाटक मी पहिल्यांदाच करते आहे. त्यामुळे तब्बल आठ वर्षांनी अभिनयात कमबॅक करते आहे. त्यामुळे खूप उत्सुक व थोडे मनावर दडपण देखील आहे.'