सिनेविश्वात सध्या कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. अलिकडेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या बेडीत अडकली. सोनाक्षीपाठोपाठ दिग्दर्शक समीर विद्वांसनेदेखील लग्नाचा बार उडवला. समीर विद्वांसने जुईली सोनाळकरसह विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते. समीर आणि जुईलीच्या लग्नाला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनदेखील समीर विद्वांसच्या लग्नात पोहोचला होता.
कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन समीर विद्वांसच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे. "यांच्या लव्हस्टोरी सत्यप्रेम की कथा या सिनेमाच्या सेटवर आम्ही खुलताना पाहिली आहे. तुमच्या या सुंदर प्रवासाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. समीर विद्वांस सर आणि जुईली तुमचं अभिनंदन", असं कार्तिकने पोस्टमध्ये म्हटलं आहे. कार्तिकच्या या पोस्टवर समीर विद्वांसने कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
समीर विद्वांसने 'सत्यप्रेम की कथा' या बॉलिवूड सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. गेल्यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ११७ कोटींचा बिजनेस केला होता. दिग्दर्शक असण्याबरोबरच समीर एक अभिनेता आणि उत्तम लेखकही आहे. अनेक मराठी सिनेमांचं त्याने लेखन केलं आहे. तर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'व्हाय झेड', 'धुरळा', 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'आनंदी गोपाळ' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची दिग्दर्शनाची बाजू सांभाळत त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.