Join us

"एक घोळ झालाय, हा सूरज चव्हाणचा बायोपिक नाही", 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा

By कोमल खांबे | Updated: April 15, 2025 15:39 IST

बिग बॉस मराठीनंतर केदार शिंदेंनी आपला शब्द पाळत सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा केला खरा पण हा सिनेमा त्याचा बायोपिक नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

सध्या सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झापुक झुपूक' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस मराठी ५च्या ग्रँड फिनालेमध्ये केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसोबत सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'झापुक झुपूक' असं सिनेमाचं नाव असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. बिग बॉस मराठीनंतर केदार शिंदेंनी आपला शब्द पाळत सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा केला खरा पण हा सिनेमा त्याचा बायोपिक नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

केदार शिंदेंनी नुकतीच 'मॅजिक एफ एम मुंबई'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत मोठा खुलासा केला आहे.

'झापुक झुपूक' हा सूरजचा बायोपिक नाही! 

"एक घोळ झालाय...मी बिग बॉसमध्ये असं जाहीर केलं होतं की सूरज चव्हाणसोबत सिनेमा करणार आहे. ज्याचं नाव झापुक झुपूक...सूरज चव्हाणवर सिनेमा करत नाहीये. ही स्टोरी वेगळी आहे. माझ्याकडे एक गोष्ट होती आणि त्या गोष्टीसाठी मला एक डिव्हाइस हवा होता. ते कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग असायला हवं होतं. या इंडस्ट्रीमध्ये माझे असंख्य मित्र आहेत जे माझे चांगले कलाकार आहेत. पण, मला यावेळी अभिनेता नव्हे तर ते कॅरेक्टर हवं होतं. मी कास्टिंगच्या बाबतीत नेहमीच खूप पर्टिक्युलर राहिलो आहे. अगं बाई अरेच्चापासून ते बाईपण भारी देवापर्यंत...कास्टिंग परफेक्ट होत नाही तोपर्यंत मी तो सिनेमा जाहीरच करत नाही. आणि सिनेमा सुरुही करत नाही", असं ते म्हणाले. 

...तेव्हा ठरवलं सूरजला सिनेमात घ्यायचं!

"बिग बॉस मराठीचा प्रिमियर झाल्यानंतर १६ स्पर्धक घरात गेले. रात्री चॅनेल रुममध्ये मी बसलो होतो. त्या टीव्हीवर सगळे कॅमेरे दिसत असतात. सगळे जण बसले होते. रात्री दीड वाजता सूरज बिग बॉसच्या वॉशरुममध्ये शिरला. बाथरुमचा दरवाजा हा नेहमी ढकल्यानंतर उजव्या बाजूने उघडतो आम्ही तीच बाजू लॉक केली होती. आणि डाव्या बाजूने तो दरवाजा उघडायचा. रात्री दीड वाजता हा मुलगा ७-८ मिनिट दरवाजाच उघडत होता. त्याला दरवाजाच उघडेना. मी ते बघत असताना मला हसू आलं. एक सर्वसामान्य मुलगा एका छोट्या गावातला आहे. मग मला ते कॅरेक्टर क्लिक झालं. त्याला मी घेतलं त्या कॅरेक्टरचं नावही सूरज आहे. सूरजच्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमती या कथेत आहेत. पण, हा सूरजचा बायोपिक नाही. ही एक लव्हस्टोरी आहे. सूरजला आजपर्यंत सगळ्यांनी रीलस्टार म्हणून बघितलं आहे. पण, मोठ्या पडद्यावर तो नक्कीच सगळ्यांची मनं जिंकेल ही मला खात्री आहे. त्याने चांगलं काम केलं आहे", असंही त्यांनी सांगितलं. 

‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही गोष्ट आहे. एका लव्हस्टोरी सोबतच वेगवेगळ्या भावनांचे मिश्रण या सिनेमात पहायला मिळणार आहे. 'झापुक झुपूक' हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :केदार शिंदेबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसिनेमा