Join us

'मी इंडस्ट्रीसाठी बाद झालो होतो...' जवळच्या माणसांमुळेच दुखावले गेले होते केदार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:15 PM

2015 मध्ये जेव्हा अगं बाई अरेच्चा २ फार चालला नाही तेव्हा मला झटका बसला होता.

सध्या मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा'ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय.  केदार शिंदेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाने कमालच केली आहे. सहा बायकांनी मिळून जी काही धमाल केली आहे ती बघायला बायका अक्षरश: ग्रुप ग्रुपने सिनेमागृहात गर्दी करत आहेत. केदार शिंदेंनी या ब्लॉकबस्टर सिनेमातून पुन्हा आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी केदार शिंदे जवळच्याच लोकांमुळे प्रचंड दुखावले होते असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.

केदार शिंदे म्हणाले, '2015 मध्ये जेव्हा अगं बाई अरेच्चा २ फार चालला नाही तेव्हा मला झटका बसला होता. कारण मी वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला होता. सिनेमा येण्याअगोदर चार दिवस ट्रायल शो झाले. इंडस्ट्रीतील तमाम लोकांनी तो सिनेमा बघितला. प्रेस शो झाले. पण कोणीच माझ्या कानात येऊन सांगितलं नाही की सिनेमा वाईट झालाय. भरभरुन कौतुक झालं. ज्या दिवशी सिनेमा रिलीज झाला तेव्हा मी पाहिलं की सगळीकडे नकारात्मक रिव्ह्यूज होते. मला कळत नव्हतं कोणाचं चुकलंय माझं की माझ्या आजुबाजुच्या लोकांचं चुकलंय. आपण सिनेमा वाईट केला तरी मी जर तुला आपलं मानतो तर तू माझ्या कानात येऊन सांग की सिनेमा फसला तर मला जाणीव होईल. हे झाल्यानंतर मी खूप दुखावलो आणि मी मालिकांकडेच वळलो.'

ते पुढे म्हणाले,'मला एकाही मराठी मालिका, सिनेमासाठी अवॉर्ड मिळाला नाही. केवळ ढॅण्टॅढॅण नाटकासाठी मला बेस्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळालाय. मला कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला बोलावलं जात नाही. सही रे सही, गंगाधर टिपरे आणि अग्गबाई साठी जेव्हा माझा विचारच केला गेला नाही तेव्हा मला धक्का बसला होता. मिळेल मिळेल म्हणून मी आजपर्यंत गप्पंय. आता तर अपेक्षाच नाही पण त्यावेळी ती गोष्ट मिळाली तर मजा आहे.'

केदार शिंदेंचा 'अग्गबाई अरेच्चा' सिनेमा प्रचंड गाजला होता. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी त्यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. नंतर त्यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे','चकटफू','घडलंय बिघडलंय' या हिट मालिका केल्या. तर आता पुन्हा 'महाराष्ट्र शाहीर','बाईपण भारी देवा' हे चित्रपच केले. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट