Join us  

'१६ सिनेमे पण पारितोषिक कुठे?' बाईपण भारी देवाच्या यशानंतर केदार शिंदेंच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 1:15 PM

आपण चांगलं काम करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही अशीच शिकवण त्यांनी दिली आहे.

केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चाळीस ते साठीच्या वयातील सहा बहिणींची कथा सिनेमातून उत्तमरित्या दाखवण्यात आली आहेच. बहिणींमधील वाद, रुसवे फुगवे, प्रेम, काळजी असे अनेक पैलू उलगडण्यात आले आहेत. सिनेमातील गाणीही लोकप्रिय ठरली आहेत. शिवाय प्रत्येकीच्या वेशभुषेचंही विशेष कौतुक आहे. या वेशभूषेचं सर्व क्रेडिट केदार शिंदेंनी त्यांच्या वहिनीला दिलंय. होय त्यांची वहिनी युगेशा सिनेमातील वेशभूषाकार आहे. 

'बाईपण भारी देवा' सिनेमाची कथा सहा बहिणींभोवती फिरते. मंगळागौर स्पर्धेत या बहिणी भाग घेतात आणि या दरम्यान काय काय घडतं हे सिनेमात दाखवलं आहे. यातील प्रत्येकीच्या वेशभूषेकडे विशेष लक्ष जातं. अगदी पारंपारिक साडीतला लुक ते वेस्टर्न लुक असे प्रत्येकीच्या वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्यात आल्या आहेत. याचंच कौतुक करत केदार शिंदेंनी युगेशासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

ते लिहितात, 'काम करण्याचं काही वय नसतं! युगेशा वयाने लहान आहे पण, ज्या जबाबदारीने तीने महाराष्ट्रशाहीर, बाईपण भारी देवा या माझ्या दोन्ही सिनेमांची वेशभूषा सांभाळली त्याला तोड नाही. तीच्या आभ्यासू वृत्तीने तीने हे अति कठीण काम सोपं केलं. तिचं प्रत्येक गोष्टीतलं पेपरवर्क हे पाहाण्यासारखं असतं. कॅरेक्टर लेखक लिहितो पण ते उभं करताना वेशभूषेतल्या बारीकसारीक डिटेल्स युगा शोधून काढते. त्याने ते कॅरेक्टर जीवंत होतं. युगा माझी वहिनी आहे. पण त्यापेक्षा ती माझ्या मुली सारखीच आहे. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेंव्हा मला "सर" म्हणते. ओंकार मंगेश नवरा म्हणून सोबत असतो पण त्याही पेक्षा तिचा गाईड म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा रहातो. एकमेकांना उत्तम कॉम्प्लिमेंट करत ते हे क्रिएटिव्ह काम करत असतात. या दोन्ही चित्रपटांच्या उद्या पारितोषिकासाठी तिची निवड झाली नाही तर, मला नवलच वाटेल. पण नाहीच मिळालं तरी युगा हरकत नाही, १६ सिनेमे करून मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक? प्रेक्षकांसाठी आपण अव्याहत काम करायचं!!'

केदार शिंदेंच्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या वाक्यातच सारं काही आलंय. आपण काम करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही अशीच शिकवण त्यांनी दिली आहे. केदार शिंदेंना त्यांच्या या उत्तम कामाचं फळ सध्या मिळतंय. 'बाईपण भारी देवा' रिलीज होऊन एक आठवडा झाला तरी अजूनही सिनेमागृहात हाऊसफुल सुरु आहे. शिवाय त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

३० जून रोजी 'बाईपण भारी देवा' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. यामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. एका आठवड्यातच सिनेमाने 12.50 कोटींची कमाई केली आहे.

टॅग्स :केदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपटसोशल मीडिया