केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. 'अगं बाई अरेच्चा', 'बाईपण भारी देवा', 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'महाराष्ट्र शाहीर' असे अनेक सुपरहिट सिनेमे केदार शिंदेंनी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. 'सही रे सही' सारखं नाटकही त्यांनी दिग्दर्शित केलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकतच केदार शिंदेंची मुलगी सना हिनेदेखील सिनेसृष्टीत करिअर करायचं ठरवलं. आज सनाचा वाढदिवस आहे. लाडक्या लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.
सनाच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पोस्ट
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. प्रत्येक बापाला आपली मुलगी जिंकावी हीच अपेक्षा असते.
तुला महाराष्ट्र शाहीर सिनेमासाठी जेव्हा जेव्हा पारितोषिक मिळालं, तेव्हा तेव्हा मीच यशस्वी झाल्याचा फील आला होता.
तुझी चाहूल जेव्हा पहिल्यांदा जाणवली,तेव्हाच "मुलगी" झाली पाहिजे अशी मनोमन इच्छा व्यक्त केली होती. आणि स्वामींनी ती इच्छा पुर्ण केली. खरतर माझाही आज वाढदिवस.. कारण तुझ्या येण्याने मी बाप झालो. जबाबदारी वाढली. माझ्य आयुष्यात जे जे मला मिळालं नाही ते ते तुला मिळायलाच हवं, हे मी ठरवलं. त्यात आत्तापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि हे पुढेही सुरू रहाणार... तुझ्यात खुपसे असे गुण आहेत, जे माझ्यात असायला हवेत असं नेहमी वाटतं. पण त्याच वेळेस माझ्यातले काही गुण तूही घ्यायलाच हवेस, असही वाटतं. आजच्या दिवशी ठरवू. आणि त्याप्रमाणे गुण ओळखून आपण आपलं आपलं कामाला लागू. स्वामी कृपा सदैव राहो.
सनाने केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली. यासाठी तिला कौतुकाची थापही मिळाली. सनाने केदार शिंदेंच्या काही सिनेमांचं असिस्टंट म्हणून काम पाहिलं आहे.