नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?, केदार शिंदेचा संतप्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 03:52 PM2021-04-27T15:52:19+5:302021-04-27T15:53:49+5:30
सामान्य लोक सोडा राजकीय नेते देखील कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. यावरूनच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कोरोनाचा कहर भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रूग्णालयातील बेड्स अपुरे आहेत. अशात लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. सगळेच हवालदिल आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सतत मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे सरकार सांगत असले तरी लोक त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. सामान्य लोक सोडा राजकीय नेते देखील कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. यावरूनच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
केदार शिंदे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते सोशल मीडियाद्वारे देशातील सद्यस्थितीवर भाष्य करत असतात. केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या एका नव्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीत एक पोस्ट शेअर केली असून त्यासोबत लिहिले आहे की, टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत...
केदार शिंदे यांनी सामाजिक गोष्टीवर भाष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. ते सोशल मीडियाद्वारे नेहमीच आपली मतं व्यक्त करत असतात.