Kedar Shinde: केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सिनेमात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केदार शिंदेनी केलेल्या एका वक्तव्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
'झापुक झुपूक' चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनी 'कलाकृती मीडिया'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान कोणत्याही दिग्दर्शकासाठी एखाद्या चित्रपटाचा प्रवास जिथून सुरु होतो ते चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येईपर्यंतचा प्रवास याकडे तुम्ही कसं पाहता? कारण धाकधूक ही काम सुरु केल्यानंतरही असते आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर असते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, "मला सिनेमा सुरु करुन लोकांपर्यंत पोहोचवण्याची धाकधूक नसते. माझा आधीचा सिनेमा संपलाय आणि लोकांना तो आवडलाय शिवाय लोकांनी तो सिनेमा डोक्यावर घेतलाय, त्या गोष्टीचं मला जास्त दडपण असतं. कारण मला कधीही रसिक प्रेक्षक भेटल्यानंतर ज्या कौतुकाने ते बोलतात की तुमचा सिनेमा आम्हाला खूप आवडला. त्यांच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दल जो विश्वास दिसतो त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. मी माझे प्रयत्न शंभर टक्के नाहीतर हजार टक्के करणार."
यानंतर पुढे केदार शिंदे म्हणाले, "यशाचा कोणताच फॉर्मूला नाही. मला त्यासाठी तेवढेचं कष्ट करावे लागणार आहेत. आपली इंडस्ट्री अशी आहे की, आपण मागे काही केलंय याच्याबद्दल लोकं विचार करत नाहीत. आता या क्षणी तुम्ही काय करताय? शिवाय तुमचं पुढचं काय मत आहे? याबद्दल विचार करतात. त्यामुळे तुम्हाला सतत अपडेट व्हावं लागतं, तुम्हाला विचार करावा लागतो की माझ्या प्रेक्षकांशी प्रतारणा करत नाही ना."अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदेंच्या प्रोडक्शन्सकडून झापुक झुपूक सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.