ख्वाडा फेम भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतायेत, ख्वाडानंतर मी झालो होतो ब्लँक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 4:00 AM
प्रेम, रोमान्स आणि हाणामारी, यासोबतच सिनेमातील पात्रांची फक्कड डायलॉग डिलिव्हरी सोबतीला घेऊन 'बबन' हा सिनेमा २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात ...
प्रेम, रोमान्स आणि हाणामारी, यासोबतच सिनेमातील पात्रांची फक्कड डायलॉग डिलिव्हरी सोबतीला घेऊन 'बबन' हा सिनेमा २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात अस्सल गावरान मातीचा धुराळा उडवण्यास सज्ज झाला आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आतापर्यंत ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत, मात्र भाऊरावांच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून साकार झालेल्या 'बबन'मध्ये प्रेक्षकांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. सामान्य ग्रामीण तरुणाची सामान्य कथा दाखवणारा 'बबन' मध्यमवर्गीय प्रेक्षकांना आपलासा करेल असा आहे. 'ख्वाडा' सिनेमाद्वारे नावारूपास आलेला रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेची 'बबन' मध्ये प्रमुख भूमिका असून यात तो एका वेगळ्याच भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. 'ख्वाडा'मध्ये लाजरा, मितभाषी आणि स्वप्नाळू दाखवलेला भाऊराव, 'बबन' सिनेमात रोमान्स तसेच फायटिंग करताना दिसून येत आहे. त्यासोबत गायत्री जाधव हा नवा चेहरासुद्धा या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. गायत्रीने यात 'कोमल' नावाची भूमिका साकारली असून, ही कोमल अल्पावधीतच सिनेरसिकांच्या मनात अधिराज्य करेल यात शंका नाही! गावच्या एका सामान्य घरातील महत्वाकांक्षी युवकाची ही कथा असल्यामुळे, लोकांना 'बबन' हा आपल्यातलाच एक वाटून जातो. विशेष म्हणजे, 'बबन' या नावातच साधेपणा असून असे अनेक बबन आपणास आपल्या जवळच्या नाक्यावर, गल्ली बोळात तसेच कॉलेज कट्ट्यावर दिसून येतात. माणसांतल्या 'बबन'ची हीच खासियत या सिनेमात मांडण्यात आली आहे.ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या सिनेमाची जडणघडण लक्षात घेता, सिनेमातील कथानक आणि त्यातील पात्रांना गावरान जोड असणे खूप गरजेचे असते. शिवाय त्या सिनेमाची धाटणीदेखील ग्रामीणबाज होण्यासाठी, तसेच गावचे विश्व मोठ्या पडद्यावर वास्त्यव्यात उतरवण्यासाठी दिग्दर्शकाचा कस लागतो. यात अनेक दिग्दर्शक फसूदेखील शकतात, परंतु 'ख्वाडा'सारखा दांडगा सिनेमा बनवणाऱ्या भाऊरावांना 'बबन'साठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. कारण, ते स्वतःच शेतकरी कुटुंबाचे असल्यामुळे ग्रामीण लोक संस्कृतीशी त्यांचे नाते जन्मापासूनचे आहे. 'बबन' च्या आठवणी सांगताना भाऊराव सांगतात की, ''खरं तर ‘ख्वाडा’ चित्रपट आम्ही बनवला तेव्हाच ‘बबन’ची पटकथा तयार होती. साधारणपणे २०१२मध्ये मी हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी लिहिले होते. मात्र त्यापैकी कोणता चित्रपट आधी करायचा एवढाच आमच्या मनात विचार सुरू होता. ‘बबन’चे बजेट थोडे अधिक होते, म्हणून आम्ही आधी ‘ख्वाडा’ करायला घेतला. ख्वाडा’च्या वेळी मला निर्मितीसाठी पैसा उभा करताना खूप संघर्ष करावा लागला होता. त्या तुलनेत ‘बबन’चा संघर्ष थोडा सोपा म्हणावा लागेल.‘ख्वाडा’मुळे एक वलय तयार झाले. नाव मिळाले. पण पैसे काही मिळाले नाहीत. उलट आर्थिकदृष्ट्या बरंच काही मला गमवावे लागले. ‘ख्वाडा’नंतर मी अक्षरशः ‘ब्लँक’ झालो होतो. आता करायचे काय, हा एक मोठा प्रश्नच होता. गावाकडं जे होतं-नव्हतं ते सगळं विकले होते. त्यावेळी भाऊसाहेब शिंदेने मला धीर दिला. ‘आपण एवढ्यात हरून चालणार नाही. आपल्याला पुढचा सिनेमा करावाच लागणार.’ ‘ख्वाडा’च्या तुलनेत ‘बबन’चे बजेट दुप्पट होते. त्यामुळे पटकथेमधील सगळ्या गोष्टी या चित्रपटात उतरवण्याचा प्रयत्न केलाय. Also Read : सिनेमा बघायला गेली आणि सिनेमाची हिरोईनच झाली,जाणून घ्या तिच्या काही खास गोष्टी