Join us

‘ख्वाडा’ फेम कऱ्हाडेंचा संगीतमय चित्रपट ‘बबन’ लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:35 AM

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क ऱ्हाडे आपला नवा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. 'बबन' या ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क ऱ्हाडे आपला नवा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. 'बबन' या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा ते रंगविणार आहेत.या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे.भाऊराव कऱ्हाडे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत.'ख्वाडा' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच त्यांच्या कडे असलेला पैसा संपला होता.शेवटी त्यांनी त्यांची शेतजमीन विकून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यांचा चित्रपट खूपच चांगला असल्याने राष्ट्रीय पुरस्काराने त्यांच्या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला.या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी या चित्रपटासाठी निर्माता शोधणे भाऊराव यांच्यासाठी खूप कठीण गेले होते. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर अनेक महिन्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता 'ख्वाडा' या चित्रपटाच्या यशानंतर बबन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बबन’ हा त्यांचा आगामी चित्रपट ‘ख्वाडा’पेक्षा पूर्णपणे वेगळा असून त्यात बबन (भाऊ साहेब शिंदे) आणि कोमल (गायत्री जाधव) यांची प्रेमकथा बघायला मिळणार आहे.‘बबन’ ही ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन युवकाची कथा आहे. या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे चित्रपटात पाच गाणी असून प्रत्येक गाणं वेगळ्या धाटणीचं आहे. गाणी हा भारतीय सिनेमाचा आत्मा आणि संगीत हे सर्व भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग असल्याने आपला दुसरा चित्रपट संगीतमय असावा अशी माझी इच्छा होती’, असे भाऊराव यांनी सांगितले. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी या गाण्याचे पाश्र्वगायन केले असून संगीत ओंकार स्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे. रेकॉर्डिंगला लाइव्ह संगीत असलेल्या या गीताचे शूटिंग प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाच्या तंबूत झाले आहे. तर या गाण्यासाठी तालवादक म्हणून संगीतकार प्रीतम यांच्या सोबत काम केलेले दिपेश वर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे भाचे शिखरनाद कुरेशी यांनी काम पाहिले आहे. ‘मोहराच्या दारावर..’  या गीतामध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बॅले असा तिहेरी संगम असून त्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केले आहे. या गाण्यांचं ध्वनिमुद्रण यशराज स्टुडिओमध्ये झाले असून गाण्याचे मास्टरिंग लंडन येथील स्टुडिओमध्ये करण्यात आले असल्याने रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.