Join us  

सायबर क्राईमवर भाष्य करण्यासाठी 'किरण कुलकर्णी' सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 9:42 AM

ओम प्रॉडकशन्स प्रस्तुत व कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ हा सिनेमा सायबर क्राइमवर आधारलेला आहे. येत्या ...

ओम प्रॉडकशन्स प्रस्तुत व कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ हा सिनेमा सायबर क्राइमवर आधारलेला आहे. येत्या २४ जून ला ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा सर्व क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या कांचन अधिकारी यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून रसिकांचं निखळ मनोरंजन करीत अनेक चांगल्या कलाकृती आजवर दिल्या आहेत. सध्या  वाढलेल्या सायबर क्राइमचं प्रमाण पाहाता हाच विषय घेऊन त्याला एक वेगळा अँगल देत कांचन अधिकारी यांनी ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ चं दिग्दर्शन केलं आहे.

हा कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा क्रेडीटकार्ड भोवती फिरते. क्रेडीटकार्डचा वापर करत कथेची नायिका कशाप्रकारे नायकाची फसवणूक करते. ही फसवणूक नेमकं कोणतं वळण घेणार? या वळणावर या दोघांमध्ये कोणते बंध निर्माण होणार? याची धमाल कथा म्हणजे ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ जगण्याच्या दृष्टीकोनावरही हा सिनेमा भाष्य करतो.

या सिनेमाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांचं आहे.

कांचन अधिकारी व वैशाली सामंत यांनी शब्दबद्ध केलेल्या गीताला गायक जसराज जोशी यांनी गायलं आहे. संगीताची जबाबदारी वैशाली सामंत तर पार्श्वसंगीताची जबाबदारी नितीन हिवरकर यांनी सांभाळली आहे.

कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत.

वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट रसिकांना नक्की भावेल असा विश्वास निर्मात्या व दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केला. २४ जून ला ‘किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.