मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी प्रेक्षकांचे आवडते अभिनेते. मामा नावानं लोकप्रिय असलेल्या अशोक सराफांवर इंडस्ट्रीचंही प्रचंड प्रेम आहे. इंडस्ट्रीची अनेक माणसं म्हणूनचं अनेकप्रसंगी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. तूर्तास अभिनेते किरण माने ( Kiran Mane) यांनी अशोक मामांबद्दलचा एक खास किस्सा फेसबुकवर शेअर केला आहे. मामांसोबतचे काही जुने फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. या फोटोत किरण माने, त्यांचे वडील आणि अशोक सराफ दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
..एक दिवस दारावरची बेल वाजली आन् "किरन्याSव" अशी हाक आली. वडलांनी दार उघडलं आन् आग्ग्गाय्याय्यायाया.. त्यांचा डोळ्याव इस्वासच बसंना... दारात चक्क अशोक सराफ !
"हे..नाय..आप्लं...हाय, हाय..हाय की किरन...या की..या या" अशी अवस्था झाली दादांची.
मामांबरोबर आमची सातारकरीन आनि पाव्हनी श्वेता शिंदे होती. तिनंच घर दावलं मामांना. बारा वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला पन फोटू बगीतले की अजूनबी ताजी वाटती.
...खरंतर लै लै लै महान नट अशोकमामा, पन सोत्ताच्या मोठेपनाचं समोरच्यावर कधी दडपन येऊ देत नाय. पांडू हवालदारपास्नं बिनकामाचा नवरा पर्यन्त... गोंधळात गोंधळपास्नं धुमधडाकापर्यन्त... आनि बनवाबनवीपास्नं एक डाव धोबीपछाडपर्यन्त गेली अनेक वर्ष पडद्यावर बगीलेल्या आपल्या आवडत्या नटाला आपल्या घरात, आपल्यासमोर बगून, हरखून गेलेल्या माझ्या घरातल्यांसोबत, मामांनी दोन तास दिलखुलास-मनमोकळ्या गप्पा मारल्या... मनसोक्त पोटपूजाबी केली !
बोलता-बोलता मामा अचानक माझ्या वडलांना-दादांना म्हन्ले, "एकतर मी खोटं बोलत नाही. आणि दूसरं म्हणजे मी प्रत्येकाबद्दल असं बोलत नाही, हे आधी सांगतो.. तुमचा मुलगा किरण हा ब्रिलीयंट ॲक्टर आहे. तो या इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करेल. बघाच तुम्ही."
...दादांचे डोळे पान्यानं डबडबले भावांनो.. मामा, तुमी हे सहज बोलून गेलात...पन दादांचा माझ्यावरचा विश्वास आयुष्यभरासाठी घट्ट केलात.. नोकरी-धंदा सोडून अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जान्याच्या माझ्या निर्णयानं, माझ्यावर कायम नाराज असलेले माझे वडिल, तवापास्नं माझे फॅन झालेत. माझ्या प्रत्येक चढउतारावर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत !
...मामा, आनखी काय बोलू? घरातले जुने अल्बम चाळताना हे फोटो सापडले आनि आठवनी जाग्या झाल्या ! लब्यू लैच.
- किरण माने.