Join us

‘जिंदगी विराट’ मधून किशोर कदम सांगणार जगण्याची ‘बाप’ गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 7:07 AM

किशोर कदम म्हणजे मराठीतील अतिशय संवेदनशील कविमन! पण ते फक्त कवीच नाही तर उत्तम अभिनेते म्हणूनदेखील रसिक प्रेक्षकांमध्ये सुप्रसिद्ध ...

किशोर कदम म्हणजे मराठीतील अतिशय संवेदनशील कविमन! पण ते फक्त कवीच नाही तर उत्तम अभिनेते म्हणूनदेखील रसिक प्रेक्षकांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या संवेदनशील कवीमनामुळेच ते प्रत्येक भूमिकेच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहोचतात. आपल्या देहबोलीतून, संवादफेक यातून प्रत्येक व्यक्तिरेखा ते जिवंत करतात.  अभिनयाच्या या स्वतंत्र शैलीमुळे फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नटरंग, जोगवा, फँड्री, गणवेश या व अशा अनेक मराठी चित्रपटांमधील तसेच समर, एक चालीस की लास्ट लोकल, स्पेशल २६ इत्यादी हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. आणि आता ते ‘जिंदगी विराट’ या चित्रपटामधून ते प्रसंगी कठोर तर प्रसंगी प्रेमळ भासणाऱ्या अतरंगी बापाची भूमिका साकारत आहेत.  मुलगा आणि बाप यांच्या नात्याची अजब गजब कहाणी सांगणारा ‘जिंदगी विराट’  काल आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 
चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि संगीतकार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अंजनेय साठे या तरुण निर्मात्याने या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची कथा, पटकथा सुमित संघमित्र याची आहे तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यानेच केले आहे.अनेक कथा, कादंबऱ्यांमधून रंगवला गेलेला बाप हा मुलाच्या सुखासाठी वाट्टेल तो त्याग करणारा नायक असतो अथवा मुलाच्या सुखाच्या आड येणारा व्यसनी खलनायक असतो. परंतु आपण बाप या व्यक्तिरेखेकडे माणूस म्हणून बघायचे विसरतो. या बापाचीही काही स्वप्न असू शकतात, आयुष्याकडून अपेक्षा असू शकतात पण बापाने मुलासाठी त्याग करायचा असतो या गोंडस विचाराच्या नादात ही स्वप्ने, या अपेक्षा विचारात घ्यायला आपण विसरून जातो. ‘जिंदगी विराट’ ही अशाच एका बापाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाची गोष्ट आहे.  या चित्रपटात मंदार चोळकर आणि सुरज-धीरज यांनी लिहिलेली एका पेक्षा एक सरस अशी तीन भन्नाट गाणी आहेत, जी सुरज-धीरज या जोडगोळीने संगीतबद्ध केली असून चित्रपटाला पार्श्वसंगीतदेखील त्यांनीच दिले आहे. या चित्रपटातील गाण्यांना सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी, जावेद अली यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी आपला आवाज देऊन चार चाँद लावले आहेत.