सध्याशल मीडियाच्या युगात वेबसिरीज हा प्रकार लोकप्रिय होऊ लागलाय. विविध वेबसाईटवर अनेक वेबसिरीज तरुणाईच्या पसंतीस पात्र ठरत आहे. सिनेमा, शॉर्टफिल्म्स आणि छोट्या पडद्यावरील मालिकांनंतर तरुणाईसह रसिकांची वेबसिरीजला पसंती मिळत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळेच की काय अनेक कलाकारांचा कसही वेबसिरीजमध्ये काम करण्याकडे दिसून येत आहे. अनेक दिग्गज कलाकार सध्या कोणत्या ना कोणत्या वेबसिरीजशी जोडले गेल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकांप्रमाणे या वेबसिरीजमध्ये काम करण्यास कलाकार मंडळींचीही अधिक पसंती आहे. वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या या कलाकारांमध्ये मराठी कलाकारही मागे नाहीत. सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीचा अभिनय तर भलताच भाऊ खाऊन गेला आहे. आता मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांचीही एक वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. स्वतः किशोरी शहाणे-विज यांनी फेसबुकवरुन याची माहिती दिली आहे. किशोरी शहाणे-विज यांची 'द गुड व्हाइब्ज' ही वेबसिरीज लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावरुन लॉन्च करण्यात आला आहे. ‘थोडंसं हे, थोडंसं ते आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टींची अनुभूती. एक नवी आणि आकर्षक कथा 8 ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे’ अशी माहिती किशोरी शहाणे-विज यांनी फेसबुकच्या माध्यमातून रसिकांना आणि त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.गेली अनेक वर्षे मराठीसह हिंदी सिनेमा आणि छोट्या पडद्यावरील मालिकांत वैविध्यपूर्ण भूमिकांमधून किशोरी शहाणे-विज यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. आता या वेबसिरीजच्या माध्यमातूनही त्या रसिकांचं मनोरंजन करतील यांत शंका नाही.
'द गुड व्हाइब्ज' ही मालिका म्हणजे आजच्या युगामध्ये शहरात राहणा-या जोडप्यांच्या रोजच्या जगण्याचे यथार्थ चित्र उभे करणारी एक मनस्वी गोष्ट आहे. हास्यरसाचा तलम पदर असलेले हे कथानक नात्यामधील मैत्री, प्रणय, नातीगोती आणि पालकत्व अशा सगळ्या पैलूंना स्पर्श करते. लक्ष्य (नवीन) आणि जोनिता (मानवी) हे त्यांच्या सामाजिक वर्तुळामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असलेले जोडपे आहे. आता मात्र हे जोडपे अशा एका भावनिक टप्प्यावर उभे आहेत, जिथे त्यांना आपले वैवाहिक नाते पुन्हा तपासून पाहण्याची गरज जाणवते आहे. एकीकडे त्यांच्या लवकरच येऊ घातलेल्या लग्नाचा वाढदिवसाचा सोहळा कसा साजरा करायचा याबद्दलच्या सूचना त्यांच्या पालकांकडून पाठविल्या जात आहेत तर दुस-या बाजूला या सोहळ्यात वेगळे होत असल्याची जाहीर कबुली तर आपल्याकडून दिली जाणार नाही ना याची दोघांच्याही मनात धास्ती आहे. अवघ्या ६ भागांमध्ये आटोपशीरपणे बसविण्यात आलेली ही गोष्ट सोनी लिव्ह आणि लग्रों इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असणार आहे.