बालकलाकार म्हणून पडद्यावर झळकलेले अनेकजण आजही चित्रपटसृष्टीत तग धरून आहेत. ‘देवकी’ (Devki) या गाजलेल्या मराठी सिनेमातील एक चिमुकला तुम्हाला आठवत असेलच. आज याच बालकलाकाराबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.‘देवकी’या सिनेमात दोन जावांमधील नातं सुंदररित्या दाखवण्यात आले आहे. यात आपलं स्वत:चं मूल जाऊबाईंना देणारी नायिका अलका कुबल यांनी साकारली आहे. अलका कबुल, गिरीश ओक, मिलिंद गवळी आणि शिल्पा तुळसकर अशा दिग्गजांसोबत या चित्रपटातील चिमुकल्यानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सिनेमात दिसलेला हा हस-या चेह-याचा चिमुकला आता मराठी इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे.
डिसेंबर 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील या छोट्या चिमुकल्याचं नाव आहे अनुराग वरळीकर (Anurag Worlikar). बालकलाकार म्हणून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘दे धमाल’ या गाजलेल्या मालिकेतही तो झळकला होता.अलीकडे देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांच्या झी युवा वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत अनुरागला तुम्ही पाहिलं असेलच. अनुरागने या मालिकेत कबीरची भूमिका साकारली होती. नुकताच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.
फार कमी लोकांना ठाऊक असेल की, अभिनेता यासोबतच दिग्दर्शक अशीही अनुरागची ओळख आहे. ‘वारसा’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शनही अनुराग वरळीकर याने केलं आहे. व्हॅकन्सी ही शॉर्ट फिल्मही त्याने दिग्दर्शित केली आहे. यापैकी ‘व्हॅकन्सी’चे संवादही त्याने स्वत: लिहिलं आहेत. प्राईम टाईम,बारायण या सिनेमात तो दिसला होता. गेल्या 20 वर्षांपासून तो मालिका व चित्रपटांत काम करतोय.