चेह-यावरच्या निखळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या अभिनेत्री सविता प्रभुणे यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. रंगभूमी गाजवणा-या सविता प्रभुणे चित्रपटांत आल्या आणि पुढे मालिकांमध्येही दिसल्या. छक्के पंजे, खरा वारसदार, लपंडाव, कळत नकळत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजल्या. यानंतर मला सासू हवी, जावई विकत घेणे आहे अशा मराठी मालिकांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. पुढे हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्येही त्या झळकल्या. ‘तेरे नाम’ या चित्रपटात सलमानच्या प्रेमळ वहिनीची भूमिका असो वा कुसूम, सारथी, पलछीन, साया या हिंदी मालिकांमधील भूमिका असो त्यांनी वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. पण आज आम्ही सविता यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या मुलीबद्दल सांगणार आहोत.
सविता प्रभुणेंना सात्विका नावाची मुलगी आहे. शालेय जीवनात अतिशय हुशार म्हणून ओळखली जाणारी सात्विका सध्या मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे.
पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सात्विकाने एमबीएची पदवी घेतली आणि याचदरम्यान ती मॉडेलिंगकडे वळली. 2014 मध्ये वॅन हुसेन कॉम्पिटिशनमध्ये मॉडेल म्हणून तिने सहभाग घेतला.
सध्या सात्विका मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करतेय. येत्या काळात आईप्रमाणे अभिनय क्षेत्रातदेखील ती आपली चमक दाखवेल, अशी आशा आहे.सविता प्रभुणे यांचे वडील डॉक्टर होते. महाराष्ट्रातील वाई, सातारा याठिकाणी त्यांचे वडील कार्यरत होते.तर नॅशनल स्कुल आॅफ ड्रामा, नवी दिल्ली येथून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. सुरुवातीला त्यांनी मराठी रंगभूमीवर काम केले. ऐतिहासिक नाटक महाराणी पद्मिनी, श्री तशी सौ, निष्पाप, तू हो म्हण , चार दिवस प्रेमाचे यासारखी नाटके त्यांनी साकारली.