Join us  

"स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय...", डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या, सिद्धार्थची विचार करायला लावणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 5:23 PM

"मला वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली, हे...", कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सिद्धार्थची पोस्ट

Kolkata Doctor Rape Murder Case :  पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरातून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. आता मराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकरने याबाबत पोस्ट केली आहे. 

सिद्धार्थने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महिला डॉक्टर आणि बलात्कारप्रकरणी भाष्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर सिद्धार्थने अगदी परखड भाषेत त्याचं मत व्यक्त केलं आहे. सिद्धार्थ म्हणतो, "मला वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली, हे आता आपण बोलायला नको...मुलगी शिकतेय, पण तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय...पण, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये. आपल्या घरातील मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येते की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातील मुलगा संध्याकाळी सातच्या नंतर कुठे जाते? काय करतो? कोणाशी संगत आहे? तो कोणाशी बोलतो? काय विचार आहेत? हे बघणं जास्त गरजेचं आहे". 

"खरंच या देशातील मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला. तर या देशाची प्रगती झाली. या देशातील मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आईवडिलांचे त्याच्या मित्राचे, नातेवाईकांचे विचार बदलले...तरंच ही भारतमाता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. नाहीतर स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनंतर सुद्धा ती दहशतीतच जगतेय...विचार करूया...", असंही त्याने पुढे म्हटलं आहे. "Sorry भारत ‘माते’! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही! हा Independence Day तुझ्यासाठी Happy नाही. क्षमा", असं म्हणत  सिद्धार्थने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

दरम्यान, डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या प्रकरणी देशभरातील लोक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाचा एका आठवड्यात तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्यास, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे जाहीर केले आहे.  

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरस्वातंत्र्य दिनमराठी अभिनेतापश्चिम बंगाल