Join us  

कौल मनाचा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 3:46 PM

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चांगल्या आणि नावीन्यपूर्ण विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याची परंपरा आहे. समाजातील असंख्य घटकांचा, अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध ...

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चांगल्या आणि नावीन्यपूर्ण विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याची परंपरा आहे. समाजातील असंख्य घटकांचा, अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध मराठी चित्रपटांनी घेतला आहे. याच पठडीतील आजच्या काळातील वास्तवाचा वेध घेणारा कौल मनाचा हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा माध्यमाने भारावलेल्या राज कुंडल या मुलाची कथा यात मांडली आहे.किशोरवयीन मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते. बऱ्याचदा मोठ्यांकडून या कुतुहलाबद्दल योग्य ती चिकित्सा होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील कुतूहलाविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेकदा चुकीचा मार्ग चोखाळतात. याच विषयावर कौल मनाचा या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. सिनेमावेडया राजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना तो कशाप्रकारे समोरे जातो? या प्रवासात त्याला कोणाची साथ मिळते? याची रंजक तितकीच भावस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भिमराव मुडे यांनी केले आहे. राजेश पाटील विठ्ठल रूपनवर आणि नरशी वासानी निर्मित कौल मनाचा या सिनेमात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले,वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.