Join us  

'कुलस्वामिनी'च्या पहिल्याच दिवशी दिसली महिला शक्ती; ठाण्यात फक्त महिलांनीच बुक केला पूर्ण शो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 1:43 PM

Kulswamini : संपूर्ण महाराष्ट्रात धडाक्यात 'कुलस्वामिनी' चित्रपट प्रदर्शित झाला.

गेल्या महिन्याभरापासून ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहात होते, तो क्षण आज अखेर आला! संपूर्ण महाराष्ट्रात धडाक्यात 'कुलस्वामिनी' (Kulswamini Marathi Movie) चित्रपट प्रदर्शित झाला. ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. तेव्हापासून या चित्रपटाविषयीची उत्कंठा ताणली गेली होती. विशेष म्हणजे देवीमातेचा जागर करण्यासाठी भक्तमंडळी आतुर झाली होती. अखेर आज देवीमातेचं भक्तमंडळींनी राज्यभरातील थिएटर्समध्ये झोकात आणि खऱ्या अर्थाने भक्तीरसात स्वागत केलं. राज्यभरातल्या चित्रपटगृहांत पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा आवाज पुन्हा एकदा मराठी गाण्याचे बोल गाऊन दुमदुमला! पण आज खरी चर्चा झाली ती ठाण्यातल्या महिलावर्गाची! आणि त्याला कारणही तसंच खास ठरलं!

'कुलस्वामिनी' चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या रुपात भक्तमंडळी चित्रपटगृहांकडे वळतील हे तर अपेक्षितच होतं. पण ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये 'कुलस्वामिनी' चित्रपटाच्या रुपात खऱ्या अर्थाने नारीशक्ती दिसून आली. हा योगायोग म्हणावा की देवी मातेचा महिमा, हे सांगणं कठीण आहे. पण विवियाना मॉलमध्ये 'कुलस्वामिनी' चित्रपटाचा आख्खा शो फक्त महिलांनीच बुक केला. त्यामुळे या महिला भक्तांच्या रुपाने साक्षात देवीमातेचा जागरच त्या चित्रपटगृहात दिसून आला!

खरंतर हा संपूर्ण चित्रपटच 'महिला शक्ती'चा उत्कृष्ट दाखलाच आहे. तब्बल १८ वर्षांनी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी एखाद्या मराठी गाण्याला आपला जादुई स्वर दिला हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. दुसरीकडे १९९२ साली प्रदर्शित झालेल्या 'दौलत की जंग' पासून या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'ढ लेकाचा'मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री चित्रा देशमुख यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाच्या कथानकात एक महिला पात्र केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या रुपाने हा एक दुग्धशर्करा योगच जुळून आला म्हणायचा! चित्रा देशमुख यांच्यासोबत प्रमुख पुरुष पात्राच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे हे आहेत.

देवीमातेच्या अगाध लीलेचं दर्शन प्रेक्षकांना घडवणारा 'कुलस्वामिनी' हा चित्रपट आज महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल आहेत. लघुपट, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपटांचा अनुभव गाठिशी असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.