नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका 'ललित २०५' लवकरच स्टार प्रवाहवर दाखल होत आहे. ही मालिका ६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे. पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे.
राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या आजीची धडपड असलेले कथानक हे या मालिकेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
'अग्निहोत्र'नंतर बऱ्याच वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. या मालिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या ‘ही एक कौटुंबिक मालिका आहे. मी साकारत असलेली आजी तुम्हाला तुमच्या आजीची नक्कीच आठवण करुन देईल याचा मला विश्वास आहे.’संग्रामने सांगितले की, 'या मालिकेत साधारण घरात साधारण गोष्टीवरून होणाऱ्या वाद, मजा व आनंदाचे क्षण यात पाहायला मिळणार आहे. या कुटुंबात मी आजीचा एकुलता एक नातूची भूमिका केली आहे. मी आतापर्यंत केलेल्या भूमिकेपेक्षा ही वेगळी भूमिका आहे.' आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. आदेश बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. 'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिरीष लाटकर या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.