Join us

खडतर वातावरणात झाले 'लपाछपी'चे शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2017 12:10 PM

बहुचर्चित 'लपाछपी' सिनेमाचा थ्रिलर येत्या  १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. पूजा सावंतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ...

बहुचर्चित 'लपाछपी' सिनेमाचा थ्रिलर येत्या  १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. पूजा सावंतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा थरार ट्रेलर पाहताना, अंगावर काटा उभा राहतो. अश्या ह्या थरकाप उडवणाऱ्या सिनेमाचे चित्रीकरण देखील, भयाण वातावरणात करण्यात आले आहे. उसाच्या शेतात, एका निर्मनुष्य वाड्यात झालेल्या या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान सिनेमाच्या संपूर्ण टीमला अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. चित्रीकरणासाठी वापरला जाणारा वाडा हा बऱ्याच वर्षापासून खाली पडला होता, शिवाय तिथे गावकऱ्यांची रेलचेलदेखील अधिक नसल्याकारणामुळे आजूबाजूचे पकडलेले साप त्या ठिकाणी सोडले जात असे. त्यामुळे, जेव्हा या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी या ठिकाणाचा विचार करण्यात आला, तेव्हा याची देखील खबरदारी संपूर्ण टीमला घ्यावी लागली होती. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान अनेक सापांना सिनेमाची टीम धैर्याने सामोरी गेली होती. खास करून, उसाच्या शेतात चित्रीकरणाचे मोठे आव्हान पूजाला होते.  एकीकडे सापाची भीती तर होतीच, पण त्याबरोबर उसाच्या धारेधार पातीपासून वाचण्याची मोठी मशागत तिला करावी लागली. या चित्रीकरणादरम्यान तिच्या हातापायाला किरकोळ जखमा देखील झाल्या होत्या. मात्र अशा प्रतिकूल परस्थितीत ही पूजाने आपल्या कसदार अभिनयाची जोड देत, सीन पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर 'लपाछपी' सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात दिग्दर्शक विशाल फुरिया यांनीदेखील चित्रीकरणाचा एक किस्सा सांगितला. पूजा स्वतः कधीच एकटी राहू शकत नाही, सतत तिच्या सोबतीला कोणीतरी हवे असते. मात्र, हा सिनेमा करताना पूजाने स्वतःहून एका बंद खोलीत एकटे राहणे पसंद केले. एका गरोदर स्त्रीला, बंद खोलीत कोंडले असल्याचा तो सीन होता, हा सीन जिवंत करण्यासाठी, तसेच त्या भूमिकेत समरसून जाण्यासाठी, पूजाने खास सरावदेखील केला. आणि त्यामुळेच हा सीन अधिक वास्तविक झाला असल्याचे विशाल फुरिया सांगतात. तसेच या सिनेमाच्या शुटींगबद्दल सांगताना पूजा देखील भरभरून बोलते. 'मी कधीच भुताचे सिनेमे पाहिलेले नाहीत, मुळात मला सिनेमाच काय मी त्या विषयाची पुस्तके देखील वाचत नाही. तसेच अंधारात एकटी जाणं देखील मी जास्त टाळते. त्यामुळे हा सिनेमा करताना, मला खूप दडपण आले होते' असे ती सांगते. तसेच 'ह्या सिनेमाचे जेव्हा मी रफकट क्लिप्स पहिल्या तेव्हादेखील मी घाबरले होते, मी या सिनेमाचा भाग असूनदेखील मला जर भीती वाटते तर, हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांवर किती परिणाम करेल याचा अंदाज लावता येतो', असेदेखील पूजाने पुढे सांगितले.  पूजाच्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू आपल्याला यात अनुभवयाला मिळणार आहे. तसेच बऱ्याच वर्षानंतर ज्येष्ठ नायिका उषा नाईक यांच्या अभिनयाची एक वेगळी झलक देखील या सिनेमाद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर प्रस्तुत, मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील निर्मित तसेच मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश सहनिर्मित 'लपाछपी' या सिनेमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉरर सिनेमांचा नवा आयाम रुजवला आहे. दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर यांनी मिळून या सिनेमाची कथा लिहिली आहे. यात अनिल गावस आणि विक्रम गायकवाड ह्यांची देखील प्रमुख भूमिका आहे.