मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर (Aanand Abhyankar) यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकलेली आहेत. २०१२ साली त्यांचे अपघाती निधन झाले. आजही त्यांनी केलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, आनंद अभ्यंकर यांची मुलगीदेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.
आनंद अभ्यंकर यांचा जन्म दोन जून १९६३ साली नागपूर येथे झाला होता आणि २४ डिसेंबर २०१२ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले होते. आनंद अभ्यंकर हे प्रचंड मेहनती कलाकार होते. एका चित्रीकरणाचे काम आटपून ते पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना अभ्यंकरांच्या कारला रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर उर्से टोल नाका जवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्यासोबत असलेला सह अभिनेता अक्षय पेंडसे याचा जागीच मृत्यू झाला.
आनंद अभ्यंकर यांनी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या वास्तव या चित्रपटात देखील काम केले होते. जिस देश मे गंगा रहता है, अकलेचे कांदे, तेरा मेरा साथ रहे, कुंकू लावते माहेरचं, मातीच्या चुली, ही पोरगी कुणाची, चेकमेट, एक विवाह ऐसा भी, चले चले, पप्पू कान्ट डान्स साला, बालगंधर्व, स्पंदन, आनंदाचे झाड, आयडियाची कल्पना या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.