Join us

"बलात्काराच्या आरोपांनी आम्ही हादरलो", रमेश भाटकर यांच्या पत्नी म्हणाल्या- "एक न्यायाधीश म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:33 IST

रमेश भाटकर यांच्यावर १७ वर्षांच्या अभिनेत्रीकडून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पहिल्यांदाच रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी याबाबत भाष्य केलं. 

रमेश भाटकर हे मराठीतील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते होते. या कलाकाराने त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत एक काळ गाजवला. पण, या हरहुन्नरी अभिनेत्यावर १७ वर्षांच्या अभिनेत्रीकडून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीबरोबरच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. रमेश भाटकर यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांमुळे सिनेसृष्टी हादरली होती. आता पहिल्यांदाच रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी याबाबत भाष्य केलं. 

मृदुला भाटकर यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. न्यायाधीश असलेल्या मृदुला रमेश भाटकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे हादरून गेल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती राहिलेल्या मृदुला भाटकर म्हणाल्या, "टेलिव्हिजन संपूर्ण दिवसभर तेच सुरू होतं. बाकी काहीच नाही. एका वर्तमानपत्राने तर असं लिहिलं की रमेशने त्या मुलीचे सेमी न्यूड फोटो मुंबईभर वाटले. म्हणजे या गोष्टींना काही अर्थच नव्हता. हे सगळं नंतर झालं. पण, ज्या क्षणाला मला कळलं तेव्हा मी हादरले होते. सकाळी सहा वाजता मला याबाबत कळलं. तेव्हा रमेश शूटिंगला गेला होता. मी त्याला बोलवून घेतलं की तू परत ये. त्याचं आपलं छान चाललं होतं. कारण रमेश तसा अतिशय जॉली, आनंदी होता. स्वत:बरोबर तो इतरांना आनंद देणारा होता". 

"मी त्याला सांगितलं की असं असं झालं आहे. तेव्हा त्याची रिएक्शन होती की अरे बापरे मग मी आता काय करायचं? मग मी आता आत्महत्या करायची का? काय करायचं? त्याला काही कळत नव्हतं की हे काय घडलंय. मग मी त्याला म्हटलं की तू आधी घरी ये. एक बायको म्हणून मला त्याच्यावर विश्वास होता. पण, एक न्यायधीश म्हणून मला त्याला विचारावंसं वाटलं की मला खरं सांग. त्याला मी म्हटलं की तू मला खरं सांग. हा प्रश्न विचारल्यावर त्याने माझ्या डोळ्यात बघत सांगितलं की मृदुला तू प्रश्न विचारतेस म्हणून मी तुला उत्तर देतोय की हे सगळं खोटं आहे आणि माझ्याकडून असं काहीही झालेलं नाहीये", असं मृदुला भाटकर यांनी सांगितलं. 

२००७ मध्ये रमेश भाटकर, दिग्दर्शक रवी नायडू यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होतो. २०१० मध्ये कोर्टाने रमेश भाटकर यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती. रमेश भाटकर यांचं ४ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झालं. त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर होता. 

टॅग्स :रमेश भाटकरमराठी अभिनेता